भाविकांना मिरचीचा ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:19 PM2017-12-27T23:19:55+5:302017-12-27T23:21:32+5:30
स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात. मात्र, मंदिराच्या रस्त्यावरच मिरची बाजार भरत असल्याने नागरिक व भाविकांंना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू राहावा, या दृष्टीने सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थानांतरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
भद्रावती शहराची पौराणिक शहर म्हणून ख्याती आहे. भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्त शहरात येतात. मात्र, मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांना दर बुधवारी मिरची बाजारामुळे हैराण व्हावे लागते. मिरची बाजारातील धुलिकणांमुळे त्रासदायक ठसका बसण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, भाविकांसह बालकेही हवालदील झाली आहेत. ज्या ठिकाणी मिरची बाजार भरतो, अगदी त्याच्याच मागे जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मिरचीच्या धुलिकणांचा त्रास होत आहे.
या बाजारातून विंजासन, गवराळा, शिवाजीनगर, सुरक्षानगर आणि अन्य वस्त्यांकडे ये-जा करणाºया नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनाही हाच जाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन पालिकेने मिरची बाजाराच्या स्थानांतरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील चिकण, मटन व मच्छी मार्केट सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. हाच पर्याय शहरातील प्रसिद्ध नाग मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून द्यावा.
मंदिर परिसराच्या बाजुला भरणारा दर बुधवारचा मिरची बाजार अन्यत्र स्थानांतरीत केल्यास भाविक व सर्वसामान्य नागरिकांची समस्या कायमची दूर होऊ शकेल. नगर परिषद प्रशासनाने यावर विचार करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.