मिरची सातऱ्याला आग; ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:02+5:302021-02-09T04:31:02+5:30
नागभीड (चंद्रपूर) : बाम्हणी येथे मिरची सातऱ्याला लागलेल्या आगीत ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना ...
नागभीड (चंद्रपूर) : बाम्हणी येथे मिरची सातऱ्याला लागलेल्या आगीत ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.
बाम्हणी येथे एक मिरची सातरा सुरू असून, या ठिकाणी मिरची साफ करण्याचे काम चालते. नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच हा सातरा आहे. जवळपास १५० मजूर या ठिकाणी काम करीत आहेत. या सातऱ्याच्या वरून अतिउच्च दाब वीजवाहिनी गेली आहे. दुपारच्या सुमारास वावटळ आली. या वावटळीत जमिनीवर पडलेली सतरंजी उडाली ती थेट या वीजवाहिनीवर जाऊन पडली. त्यामुळे शाॅर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र काही वेळानंतर आगीने भडका घेतला. त्यामुळे मजुरांची एकच तारांबळ उडाली. जवळ असलेल्या साधनांनी त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. लागलीच नागभीड अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बंब हजर झाला. पाण्याच्या माऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.
बाम्हणी येथील हा मिरची सातरा नागपूर येथील मलिक ट्रेडर्स संचलित करीत आहे. या आगीत ४५ लाख रुपये किमतीची मिरची आणि ५ लाख रुपये किमतीचे शेड भस्मसात झाले.