हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते चिरान सागवान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 08:43 PM2023-03-29T20:43:41+5:302023-03-29T20:44:10+5:30
Chandrapur News चिरान सागवानाची लाकडे ही तब्बल एक हजार वर्ष टिकत असल्याने त्यांची निवड अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाकरिता करण्यात आली आहे.
चंद्रपूर : सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे, यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील डेहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन ॲन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
हजार ८५० घनफूट लाकडाचा करार...
राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या तज्ज्ञांनी वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर तसेच आलापल्ली येथील डेपाेत नोव्हेंबर २०२२ रोजी जाऊन तेथील लाकडांची पाहणी केली. १ हजार ८५४ घनफूट चिरान सागवान लाकूड खरेदीचा करार वनविकास महामंडळाशी केला. या लाकडाची किंमत एक कोटी ३१ लाख ३१ हजार ८५० रुपये आहे. कटाई केलेल्या लाकडाची पहिली खेप बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डेपोतून रवाना होऊन येथीलच वनविभागाच्या काष्ट भांडारात विधिवत पूजन करून रवाना करण्यात आली. उरलेले लाकूड येथून पुढे टप्प्या-टप्प्याने पाठविले जाणार आहे.
प्रत्येक लाकडावर ‘श्रीराम’
गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली येथे आलेल्या प्रत्येक लठ्ठा (पूर्ण लाकूड)वर श्रीराम असे लिहिलेले होते. आराम मशीनवर लहान स्वरूपात कटाई केल्यानंतर आता प्रत्येक साइजवर श्रीराम असे लिहिण्यात आले आहे. श्रीराम मंदिर बांधण्यासाठी आपल्या हातून अयोध्येला लाकूड जात असल्याचे समाधान तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. बल्लारपूर येथील वनविभागाचा काष्ट भांडार परिसर व भिंती विविध चित्रांनी सजविण्यात आल्या होत्या.
...असा असेल लाकडांचा प्रवास
बल्लारपुरातून रवाना होणारे लाकूड थेट अयोध्येला न नेता प्रथम नागपूरला नेण्यात येईल. तेथे लाकडांवर प्रक्रिया करून त्यातील अनावश्यक पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. तेथून हैदराबाद किंवा गुजरात येथे नेल्यानंतर त्यावर नक्षीकाम होईल. त्यानंतर हे लाकूड अयोध्या येथे नेण्यात येणार आहे.
सेंट्रल व्हिस्टामध्ये चंद्रपुरातील सागवान काष्ठ
दिल्लीतील नवे संसद भवन सेंट्रल व्हिस्टासाठीही या सागवान लाकडाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता राम मंदिरासाठीही याच लाकडाची निवड झाली आहे.