बोंड अळीच्या जागृतीसाठी निघाला चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:42 PM2018-07-31T22:42:29+5:302018-07-31T22:44:01+5:30
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत.
Next
ठळक मुद्देउदय पाटील : गुलाबी बोंड अळीवर वेळीच फवारणी करा
लोकमत
न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी बोंडअळी संदर्भातील जनजागरण करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कापसाच्या पिकाला पाती लागायला सुरूवात झाल्यावर किंवा ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंड अळीचे पतंगाचे पाहणी करुन फवारणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी यावेळी केले.
राज्य शासनाच्यामार्फत गुलाबी बोंड अळी पासून कपासीचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक मोहिम राबवली जात आहे. यासाठी सर्वत्र जनजागरण करण्यात येत आहे. मागील वर्षी कपाशीचे पीक घेऊ नये, अशा पद्धतीचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी आपल्या जमिनीमध्ये लाखो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केलेली आहे. मात्र आता पेरणी केल्यानंतर ४० ते ४५ दिवसांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. जर पाती लागायला सुरुवात झाली असेल आणि ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंडअळीच्या पतंगाची अस्तित्व दिसून येत असेल तर फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रति लिटर पाण्यामध्ये २ मिलीलीटर क्वीनॉलफॉस, थायोडीकार्ब, क्लोरोपायरी फॉस, सायपरमेथ्रीन आदी किटकनाशके योग्य प्रमाणात वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांना जागृत करण्यात जिल्हाभरात चित्ररथाच्यामार्फत गुलाबी बोंड अळीची ओळख व जीवनक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये येणाऱ्या चित्ररथाचे स्वागत करावे, जनजागृतीसाठी वाटण्यात येणाºया पत्रकांतून गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचनाही कृषी विभागाकडून करण्यात आल्या.
फवारणी करताना काळजी घ्या
शासनाने शिफारस केलेलीच कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच त्याची काळजीपूर्वक फवारणी करवी, मागील वर्षी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याचे अनेक दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटना टाळण्यासाठी फवारणी करताना संरक्षक पोषाख, बूट हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.