अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 11:08 AM2022-02-01T11:08:09+5:302022-02-01T11:19:21+5:30

चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे.

chorti gramsabha's unique planning of self reliance by planting fruit trees under forest rights act in village | अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देभारतातील पहिलाच प्रयोग शासनाने ग्रामसभेला दिलेल्या २२९.६१ हेक्टर जमिनीचा सदुपयोग

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूवैकुंठ अड्याळ टेकडी नेहमी प्रयोगभूमी राहिली आहे. आता लगतच्या चोरटी ग्रामसभेने हाच आदर्श जोपासत सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या (२२९ हेक्टर ६१ आर.) जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे.

सध्या ६५ नागरिकांना झाडांचे संवर्धन, संगोपन व संरक्षण करण्याकरिता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम देण्यात आले आहे. प्राप्त क्षेत्रफळापैकी काही भागात विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. येत्या काळात पूर्ण जागेत फळझाडांची लागवड करून गाव स्वयंपूर्ण, स्वावलंबी व बळकटीसाठी ग्रामसभेची वाटचाल सुरू आहे. फळबागेतील उत्पन्नावर गावातील सर्व कुटुंबीयांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

संत गजानन महाराज संस्थानच्या मार्गदर्शनात व सहयोगातून पूज्य तुकारामदादा गीताचार्य आणि ग्रामसभा बळकटीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या ग्रमगीता प्रेमाने गाव स्वयंपूर्ण, स्वावलंबी व बळकट व्हावे, याकरिता ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्कातून मिळालेल्या जमिनीवर विविध फळझाडांची लागवड मागील तीन वर्षांपासून सुरू केली आहे. यात विविध प्रजातीच्या आंबा, लिंबू, आवळा, शेवगा, सीताफळ, चिकू, डाळिंब, संत्रा यासह विविध वृक्षांची लागवड केली आहे. चोरटी व भगवानापूर गट ग्रामपंचायत आहे.

संत गजानन महाराज संस्थान शेगावची प्रथम मदत

प्राप्त क्षेत्रफळातील काही जमिनीवर ग्रामसभेत फळझाडे लावण्याचा ग्रामसभेने ठराव घेतला. झाडांची उपलब्धता व पाण्याची व्यवस्था याबाबत तत्कालीन व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्याशी चर्चा करून गाव स्वयंपूर्ण, स्वयंमशासित व स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून झाडे व पाण्याची सोय व्हावी. यासाठी दोन बोअरवेलचा खर्च शेगाव संस्थानने ग्रामसभेला सहयोग म्हणून उपलब्ध करून दिला. म.ग्रा.रो.ह. योजनेतून १३ हजार ४०० फळझाडे, तर आयसीसी बँकेकडून १९ हजार झाडे उपलब्ध करून दिली आहेत.

देशातल्या लाखो ग्रामसभांना सामूहिक वनहक्काचे दावे प्राप्त झाले आहेत. त्यातील वेगळेपण जोपासणारी चोरटी ग्रामसभा. भविष्यात संपूर्ण गावाला रोजगार प्राप्त करण्यासाठी फळबाग लावली असून ही फळबाग उर्वरित क्षेत्रात वाढविण्यात येईल. सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांनी असे उपक्रम हाती घेऊन ग्रामसभा स्वयंपूर्ण कराव्यात.

- मोरेश्वर उईके, अध्यक्ष, ग्रामसभा चोरटी.

Web Title: chorti gramsabha's unique planning of self reliance by planting fruit trees under forest rights act in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.