खताच्या बॅगमध्ये चक्क गोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:26+5:302021-07-12T04:18:26+5:30
शेतकऱ्याची फसगत : गोंडपिपरी तालुक्यातील प्रकार नीलेश झाडे / राजेश माडूरवार गोंडपिपरी/वढोली : कपाशीला खत टाकण्यासाठी शेतकऱ्याने खताची बॅग ...
शेतकऱ्याची फसगत : गोंडपिपरी तालुक्यातील प्रकार
नीलेश झाडे / राजेश माडूरवार
गोंडपिपरी/वढोली : कपाशीला खत टाकण्यासाठी शेतकऱ्याने खताची बॅग घेतली. त्या खताच्या बॅगेतून जवळपास अर्धा किलोचे दगड निघाले. हा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथे घडला. हा प्रकार सोशल मीडियाचा माध्यमातून समोर आल्यानंतर तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील सुपगाव येथील शेतकरी मनोज दुर्गे यांनी पिकाच्या वाढीकरिता गोंडपिपरी तालुक्यातील एका कृषी केंद्रातून खताची खरेदी केली. शनिवारी कपाशीच्या पिकाला खत देण्यासाठी खताची बॅग शेतात घेऊन गेले. क्रिभस्को कंपनीचा अमोनिया सल्फेटच्या २०:२०: ०: १३ या बॅगमध्ये चक्क काळे दगड निघाले. खत निर्मिती करणारी कंपनी खतात काळे दगड मिसळून त्या खताची विक्री करीत असल्याचा हा धक्कादायक प्रकार दुर्गे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला. या प्रकारावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कृषी केंद्रातून बियाणे, खतांची बेभाव दराने विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. तशी तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची कृषी विभागाने दखल घेतलेली नाही. असे असताना खताच्या बॅगमधून चक्क दगड निघालेत. या प्रकाराची चर्चा तालुक्यात सुरू असली तरी कृषी विभाग मात्र झोपेतच आहे. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोट
खत, बियाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्याकडून आमची फसगत सुरू आहे. कपाशी पिकाला टाकण्यासाठी मी खताचा बॅग आणली. या बॅगेतून काळे दगड निघालेत. त्या कंपनीवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
- मनोज दुर्गे, शेतकरी सुपगाव
110721\img-20210710-wa0015.jpg
खत