वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:35 PM2018-09-28T22:35:26+5:302018-09-28T22:36:05+5:30
सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाने अनेकजण ग्रस्त झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग मूग गिळून बसले आहे. या आजारांवर तत्काळ नियंत्रण आणा, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडकले. डीनला घेराव घालत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या रोगाने अनेकजण ग्रस्त झाले आहेत. असे असताना आरोग्य विभाग मूग गिळून बसले आहे. या आजारांवर तत्काळ नियंत्रण आणा, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडकले. डीनला घेराव घालत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
डेंग्यूने चंद्रपूर जिल्ह्यात थैमान घातले आहे आणि त्यातच सरकारी दवाखान्यात भोंगळ कारभार सुरू असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. सरकारी दवाखान्यात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य असल्यामुळे रुग्णासोबत जाणारी चांगली व्यक्तीसुद्धा आजारी पडत आहे. सोबतच डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यासाठी पुरेशी सोय दवाखान्यात उपलब्ध नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी मनसे पदाधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. याची दखल घेत मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. एस. मोरे यांच्या दालनात जाऊन धडकले. त्यांना घेराव घालत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करून त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुुनिता गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, शहर सचिव भरत गुप्ता, शहर उपाध्यक्ष महेश शास्त्रकार, महिला सेना उपाध्यक्ष माया मेश्राम, मनविसे तालुका उपाध्यक्ष मयूर मदनकर, मनविसे उपशहर अध्यक्ष नितेश जुमडे, मनविसे तालुका सचिव करण नायर, शिरीष माणेकर, सतीश वाकडे, चैतन्य सदाफळे, राकेश बोरीकर, ऋषिकेश बालमवार व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाभर डेंग्यूचे रुग्ण
चंद्रपूर शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातच सध्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. गावागावात डासांचा प्रादुर्भाव झाला असून अनेक गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे लक्ष नाही. त्यामुळे गावागावात मलेरिया, डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अनेक जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. गावागावात रुग्णांची संख्या वाढत असली तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावागावात रुग्णालये असतानाही तेथील रुग्णांना चंद्रपूरला हलवावे लागत आहे. मात्र चंद्रपुरातील सामान्य रुग्णालयातही भोंगळ कारभार सुरू आहे.