गणेशोत्सव परवानगी व तक्रारींसाठी ‘सिटीझन पोर्टल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:10 PM2018-09-07T23:10:15+5:302018-09-07T23:10:44+5:30
पूर्वी गणेशमंडळाला गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठी विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र पोलीस दलातर्फे ‘सिटीझन पोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे मंडळाचे सदस्य घरबसल्या गणेशोत्सव व नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज करु शकणार आहेत.
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पूर्वी गणेशमंडळाला गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठी विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र पोलीस दलातर्फे ‘सिटीझन पोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे मंडळाचे सदस्य घरबसल्या गणेशोत्सव व नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज करु शकणार आहेत. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांची डोकेदुखी कमी झाली असून त्याचा वेळ वाचण्यास मदत मिळाली आहे. या पोर्टलद्वारे ७ सप्टेंबपर्यंत जिल्ह्यातील ४७ गणेश मंडळानी परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले असल्याची माहिती सीसीटीएनएसचे प्रभारी सी. जी. लांबट यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे केंद्र शासनाने ई-गर्व्हनर उपक्रमातंर्गत ‘सिटीझन पोर्टल’ची सुरुवात केली आहे. त्याद्वारे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्यामाध्यमातून विविध सोई सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यानुसार एमएच पोलीस डॉट महाराष्ट्र डॉट गर्व्हमेंट ईन हे संकतेस्थळ उपलब्ध करण्यात आले असून त्यानुसार गणेशोत्सव व नवरात्री तसेच विविध कार्यक्रमाची परवानगी व तक्रार करता येणार आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर नवरात्री महोत्सवाची परवानगी आॅनलाईन पद्धतीने देण्यात आली होती. मात्र त्यामुळे त्रूटी आल्याने यावर्षी सुधारणा करुन पहिल्यांदाच गणेश उत्सवाची परवानगी पोर्टलद्धारे देण्यात येत आहे.या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नागरिकांसाठी संकेतस्थळ टाकल्यानंतर क्रिएट सिटीझन हा पर्याय निवडून तेथे पूर्ण माहिती भरल्यानंतर आपला युझर आॅयडी व पासवर्ड तयार करावयाचा असून लाग इन करावयाचा आहे.
त्यामध्ये दिलेली पूर्ण माहिती भरुन अर्ज सबमीट करावयाचा आहे. त्यानंतर सीसीटीएनएस अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज जाईल. त्यांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस विभागाचे कर्मचारी मंडळाला भेट देण्यासाठी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना निश्चित दिवस व वेळ देऊन मंडळाच्या सदस्यांना भेट देण्यात आहे. त्यानंतर संबंधीत पोलीस विभागाचे अधिकारी परवाना देण्याचा निर्णय घेणार आहेत. त्याबाबत संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात जाऊन परवाना प्राप्त करुन घेऊ शकतात.
वर्षभरात जिल्ह्यात केवळ ११ तक्रार
सिटीझन पोर्टलवर नागरिक आपल्या तक्रारीसुद्धा दाखल करु शकतात. मात्र इंटरनेबाबत अपूरे ज्ञान असल्यामुळे आॅनलाईन तक्रारी करण्याचा ओघ कमी आहे. मागील वर्षीपासून जिल्ह्यात केवळ ११ जणांनी आॅनलाईन तक्रार केली होती. त्यापैकी ११ तक्रारीसुद्धा एमसी मॅटरसंदर्भातील होती. त्या सर्व तक्रारीचा निपटारा करण्यात आला आहे.
पोर्टलद्वारे गुन्ह्यांची माहिती मिळणार
सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रीतील गुन्ह्यांचे प्रमाण, आरोपीची माहिती, अटल गुन्हेगारांची माहिती, अनोळखी मृतदेहबाबत माहिती, आरोपींना झालेली शिक्षा हरवलेले इसमाबाबत माहिती आदीबाबत सिटीझन पोर्टलमधून माहिती मिळणार आहे.