खडबडीत रस्त्याने एकोरी प्रभागातील नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:29 AM2021-04-09T04:29:53+5:302021-04-09T04:29:53+5:30

समस्या सोडवायला नगरसेवकांकडे वेळच नाही : चंद्रपूर : नगरपालिकेचे विसर्जन होऊन महानगरपालिका झाल्यानंतर एकोरी प्रभागातील समस्या सुटतील अशी, आशा ...

Citizens of Akori ward are suffering from rough roads | खडबडीत रस्त्याने एकोरी प्रभागातील नागरिक त्रस्त

खडबडीत रस्त्याने एकोरी प्रभागातील नागरिक त्रस्त

Next

समस्या सोडवायला नगरसेवकांकडे वेळच नाही :

चंद्रपूर : नगरपालिकेचे विसर्जन होऊन महानगरपालिका झाल्यानंतर एकोरी प्रभागातील समस्या सुटतील अशी, आशा या प्रभागातील नागरिकांना होती. मात्र रस्ते, नाल्या, पाणी आदी मूलभूत समस्या आताही या प्रभागात आ वासून उभ्या आहेत. प्रभागातील बहुतांश रस्ते खडबडीत व अरुंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडे स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या प्रभागातील नागरिकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला

चंद्रपूर शहरातील एकोरी प्रभागात घुटकाळा, एकोरी वॉर्ड, छोटा बाजार, मिलन चौक, रहमतनगर, दर्गा वॉर्ड, अभय टॉकीज चौक, ख्रिश्चन कॉलनी, सम्राट अशोक चौक, भवसार चौक आदी भागाचा समावेश आहे. या प्रभागाचे नेतृत्व वीणा खनके, सखीना अन्सारी, अशोक नागपुरे, दीपक जयस्वाल करीत आहे. हे सर्व नगरसेवक अनुभवी आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व समस्यांशी परिचित आहेत. मात्र या प्रभागात पाहिजे तसा विकास करण्यात या नगरसेवकांना अपयश आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे जाळे विणल्या जात आहे. मात्र या प्रभागातील बहुतांश रस्ते खडबडीत आहेत. अमृत योजनेसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची केवळ थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. अनेक ठिकाणी पाणी लिकेज होत असून रस्त्यावरुन वाहताना दिसून येते. अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घंटागाड्या दररोज घरोघरी फिरत असल्याचा मोठा कांगावा करण्यात येत असला तरी प्रभागातील रस्त्यावरच कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसून येतात. मनपाने स्वच्छ व सुंदर शहर म्हणून मोठा गाजावाजा केला. परंतु, या प्रभागात चौफेर अस्वच्छता दिसून येत असून नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बॉक्स

पाण्याची समस्या बिकट

चंद्रपुराची जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. बहुतांश वाॅर्डात मुबलक पाणीपुरवठा होतो. मात्र एकोरी वॉर्डात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तोही अल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने आजही या प्रभागातील नागरिक दुचाकी, सायकलने पाणी आणत असल्याचे चित्र आहे. बहुतांश ठिकाणी असलेल्या हातपंपाच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. तर काही ठिकाणचे हातपंप बंद आहेत.

बॉक्स

अग्निशमन वाहन जाण्यास रस्ताच नाही

अग्निशमन वाहन किंवा रुग्णवाहिका जाण्यासाठी मार्ग असावा असे रस्ते असणे गरजेचे आहे. मात्र एकोरी प्रभागातील रस्ते खूपच निमुळते व अरुंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन अग्निशमन यंत्र किंवा रुग्णवाहिकासुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे एकाद्या वेळेस चुकून आग वगेरे लागल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

प्रभागात उद्यानांची वानवा

शहरातील बहुतांश प्रभागात उद्यान बनविण्यात आले आहे. छोटे मुले व ज्येष्ठांना सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी हे उद्यान गरजेचे आहे. मात्र या प्रभागात एकही उद्यान नाही. त्यामुळे लहान मुलांना व ज्येष्ठांना फिरण्यासाठी अडचण जाते. येथील म. फुले शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक उद्यान बनविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

नगरसेवकांच्या घरासमोरच कचऱ्याचा ढिगारा

भवसार चौकातून पोलीस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरसेवक अशोक नागापुरे यांचे घर आहे. हे अनुभवी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. यांच्या घराच्या समोरच मोठा कचऱ्याचा ढिगारा दिसून आला. त्यासोबतच मानवटकर हॉस्पिटलसमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे. हा कचऱ्याचा ढिगारा उचलावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले.

------

रस्त्याच्या मध्यभागीच पाण्याचे व्हाॅल

एकोरी प्रभागातील मुख्य रस्त्यावर व्हाॅल आहेत. येथून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. केवळ काळा पाईप टाकून पाण्याचा व्हाॅल तयार केला आहे. त्याठिकाणी कुठलेही निशाणी चिन्ह नसल्याने दुचाकीधारकांचा अपघात झाला आहे. याबाबत अनेकदा नगरसेवकांना कल्पना देण्यात आली. मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.

प्रतिक्रिया

भवसार चौकातील रस्त्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. येथे पथदिवे लावण्यात यावे. सायंकाळच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य राहत असल्याने असामाजिक तत्वांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

सागर जोगी

----

एकोरी वॉर्डातील पोलीस चौकी नेहमी बंद असते. ती सुरु ठेवण्यासाठी निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली नाही. रस्ते, नाली, अस्वच्छता या समस्या प्रभागात मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

-प्रवीण लांडगे

------

पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता फोडण्यात आला. मात्र त्याची व्यवस्थित दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पूर्वीच खाचखळगे असलेला रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. परिसरात एकही उद्यान नसल्याने ज्येष्ठांना व लहान मुलांना फिरण्यासाठी अडचण जाते.

भास्कर मुधोळकर

Web Title: Citizens of Akori ward are suffering from rough roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.