‘आधार’साठी नागरिक निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:15 AM2017-12-18T00:15:47+5:302017-12-18T00:16:25+5:30
आॅनलाईन लोकमत
मूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.
शासकीय व खासगी कामासाठी आधार कॉर्डची सक्ती करण्यात आली. तर ३१ डिसेंबरपूर्वी आधार कॉर्ड बँक खात्याशी जोडणी न केल्यास बँक खाते बंद करण्याच्या सूचना बँकेकडून वारंवार देण्यात येत आहे. यामुळे नागरिक आधार कॉर्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर जात आहेत. मात्र आधार केंद्र चालक शासनाच्या आदेशानुसार केंद्र बंद करण्यात आलेले आहे, असे सांगून परत पाठवित आहे. महाआॅनलाईन सेवेमार्फत मूल येथे पुपरेड्डीवार आणि वखरांगी ईगर्व्हनल कंपनीमार्फत रामटेके यांचे गांधी चौकात ग्राहक सेवा केंद्र सुरु होते.
याआधार केंद्रामधून नागरिकांना नियमित आधार कार्ड काढण्याची सवलत होती. मात्र काही दिवसांपासून यांची सेवा शासनाने बंद केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात आपले आधार सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे हे दोन्ही आधार केंद्र काही दिवसांपासून बंद आहे.आजच्या स्थितीत मूल शहरात एकही आधार केंद्र नसल्यामुळे आधार कॉर्ड काढायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मूल तालुक्यातील मौजा चिरोली आणि फिस्कूटी येथे महासेवा केंद्र आहेत, मूल तालुक्यासाठी केवळ दोन आधार केंद्र कार्यरत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते, यामुळे शासनाने मूल शहरातही आधारकॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आधार केंद्र लवकरच सुरु करणार
शासनाच्या अधिसूचनेनुसार आधार केंद्राना शासकीय कार्यालयात आपले केंद्र हलविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांना आधार कॉर्ड काढणे गरजेचे आहे. यामुळे मूल शहरात लवकरच आधार केंद्र सुरु करण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती मूलचे उपविभागीय अधिकारी एम. व्ही. खेडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.