उघड्यावरील मांस विक्रीमुळे गुदमरतोय नागरिकांचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:38+5:302021-04-08T04:28:38+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या पंचशील प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध ठिकाणी उघड्यावर मांस विक्री केली जात ...

Citizens are suffocating due to open meat sales | उघड्यावरील मांस विक्रीमुळे गुदमरतोय नागरिकांचा श्वास

उघड्यावरील मांस विक्रीमुळे गुदमरतोय नागरिकांचा श्वास

Next

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या पंचशील प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध ठिकाणी उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरत असून महापालिका प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सोबतच जयपुरा गेट, संत कवरराव चौक तसेच दवाबाजार परिसरात मूत्रिघरांची व्यवस्था नसल्याने वाट्टेल तिथे नागरिक आपले काम आटोपत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रभागात पाणी, नाली स्वच्छतेकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रभागाचे नेतृत्व काही नवख्यांकडे असले तरी राजकारणातील अनुभवी असलेले नगरसेवक तसेच सध्याचे स्थायी समिती सभापती रवी आसवानी हेसुद्धा या प्रभागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे किमान या तरी समस्या सोडवाव्यात, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

पंचशील प्रभाग ७ मध्ये सध्यस्थितीत सर्वच्या सर्व नगरसेवक भाजपचेच आहेत. यामध्ये राहुल घोटेकर, छबू वैरागडे, रवी आसवानी, शीतल आत्राम यांचा समावेश असून ते वॉर्डाचे नेतृत्व करीत आहेत. हा प्रभाग पंचशील चौक, नगिनाबाग, रामनगर, मित्रनगर, जलनतर, जटपुरा गेट असा विस्तारलेला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सोबतच या प्रभागातील सर्वच नगरसेवक भाजपचे असल्यामुळे या प्रभागाचा विकास करणे सहज शक्य आहे. मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या या प्रभागाचा पाहिजे तसा विकास झाल्याचे पाहायला मिळत नाही. नाही म्हणायला पंचतेली हनुमान मंदिर परिसरामध्ये सभामंडप, छोटीशी बाग, त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र येथेही स्थिती बिकट आहे. बागेमध्ये झुडपे वाढली असून खेळण्याचे साहित्यही गंजले आहे. देखभाल-दुुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वत्र अस्वच्छता असल्यामुळे येथे नागरिक येण्याचे टाळतात.

प्रभागामध्ये बहुतांश ठिकाणी उघड्यावरच मांस विक्री केली जात आहे. यामध्ये पंचशील चौक परिसर, रामनगर ते बिनबागेट परिसराकडे जाणारा रस्ता, सेंट मायकल स्कूल, दवा बाजार शेजारी या ठिकाणी काही नागरिक उघड्यावरच मांस विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सेंट मायकल स्कूल परिसरात तर मांस विक्रीचा बाजारच भरत असल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे, काही नागरिक ऐन रस्त्यावरच आपले दुकान थाटत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, यातून निघणारा कचराही ते जवळपासच टाकत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. जटपुरा गेट परिसरात मांस विक्रीसाठी एक खोली तयार करण्यात आली आहे. मात्र यात कोणी न बसता सर्वच जण समोरील जागेत उघड्यावरच व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किमान नगरसेवकांनी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

बॉक्स

रस्त्याचे काम रखडलेले

इतर प्रभागांच्या तुलनेमध्ये हा प्रभाग मोठा आहे. त्यामुळे या प्रभागात समस्यांही तितक्याच जास्त आहेत. काही रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. मात्र अजूनही बऱ्याच रस्त्यांचे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटीकरण तसेच नालींचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

फोटो आहे.

नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

प्रभागातील नगिनाबागमधून सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठा नाला आहे. या नाल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आहे. मात्र नाल्याची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने मोठा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. सध्यस्थितीत नाल्यामध्ये गाळ तसेच झुडपे वाढली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

बाॅक्स

फोटो

कचरा साचलेला

प्रभागातील विविध चौकांमध्ये कचरा साचलेला पाहायला मिळतो. विशेषत: चोरखिडकी, पशुदवाखाना परिसर, नगिनाबाग, पंचशील वॉर्डात विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्या तुलनेत सिंधी पंचायत समिती परिसरात स्वच्छता बघायला मिळाली.

बाॅक्स

फोटो

धोकादायक वृक्ष हटलाच नाही

या प्रभागाअंतर्गत जटपुरा गेटच्या अगदी शेजारी किल्ल्याच्या भिंतीवर असलेल्या एक भला मोठा वृक्ष कोसळण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात परिसरातील नागिरकांनी वारंवार नगरसेवकांकडे माहिती देऊन झाड हटविण्यासंदर्भात सांगितले. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याच नगरसेवकाला जाग आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बाॅक्स

फोटो

जटपुरा गेट परिसरात स्वच्छतागृह नाही

या प्रभागामध्ये येणाऱ्या जटपुरा गेट परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने उघड्यावर बसावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. नाही म्हणायला महापालिकेने फायबरचे एक स्वच्छतागृह किल्ल्याच्या भिंतीशेजारी ठेवले आहे. मात्र त्यामध्ये इतकी घाण साचली आहे की, परिसरात जाणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच काही व्यावसायिकांनी येथे अतिक्रमण करून ठेवले आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बाॅक्स

पाण्याची समस्या कायमच

या प्रभागामध्ये सर्वसमावेशक नागरिकांचे वास्तव आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे पाण्याची समस्या सोडविणे गरजेचे आहे. मात्र येथे महापालिकेद्वारे सोडण्यात येणाऱ्या नळाचे पाणी नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत. सोबतच प्रभागामध्ये असलेल्या बहुतांश बोअरवेलसुद्धा बंद अवस्थेत आहेत. जटपुरा गेट परिसरामध्ये असलेली एक बोअरवेल सुरू करण्यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांच्या घरी चकरा मारल्या. मात्र त्याचा अजूनही फायदा झालेला नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

बाॅक्स

फोटो

प्रभागात अतिक्रमणाची समस्या गंभीर

प्रभागामध्ये जागोजागी अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. वाट्टेल तिथे अतिक्रमण बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगिनाबाग सवारी बंगच्याच्या शेजारील रस्ता अतिक्रमणामुळे अगदीच निमुळता झाला आहे. सोबतच जटपुरा गेट, पंचशील वॉर्डातील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, संत कवरराम चौकाकडून जटपुरा गेटकडे जाणाऱ्या रस्त्याचे नव्यानेच सिमेंटीकरण झाले आहे. या रस्त्यावरही काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. काहींनी तर अगदी रस्त्याच्या मध्येच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता मोठा असतानाही येथे वाहतूककोंडी होत आहे. या रस्त्यावरून सभापती रवी आसवानी यांच्यासह अन्य नगरसेवकांची नेहमी ये-जा असते. मात्र त्यांनीही याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कोट

नागरिक काय म्हणतात...

प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांना अपयश आले आहे. बहुतांश वेळा नागरिक समस्या घेऊन नगरसेवकांकडे जातात. मात्र त्या न सोडविता केवळ आश्वासन देऊन समाधान केले जात आहे. पिण्याच्या पाण्याची, कचरा तसेच स्वच्छतेसंदर्भात प्रभागात समस्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी या समस्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

- महेश काहीलकर,

नागरिक

--

प्रभागातील समस्या सोडवून दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र समस्या काही सुटल्याच नाहीत. हनुमान मंदिर परिसरामध्ये असलेली बाग तसेच खेळण्याचे साहित्य सद्य:स्थितीत धूळ खात पडले आहे. त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. वॉर्डात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे किमान याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- वैभव माकडे,

नागरिक

कोट

कचऱ्याची नियमित उचल केली जात नाही. नालीतील गाळ काढल्यानंतर त्वरित उचलणे गरजेचे असतानाही तो उचलला जात नाही. परिणामी, रस्त्यावर पुन्हा माती साचत आहे. नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

सतीश चहारे,

नागरिक

Web Title: Citizens are suffocating due to open meat sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.