नागरिक घालत आहेत दोन मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:31+5:302021-06-06T04:21:31+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई ...

Citizens are wearing two masks | नागरिक घालत आहेत दोन मास्क

नागरिक घालत आहेत दोन मास्क

googlenewsNext

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणे सुरु केले आहे. तसेच वाढत्या मृत्यूने नागरिकही भयभीत झाले असून डब्बल मास्क घालताना दिसून येत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने विना मास्क घालून फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी करण्याचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडताना सर्वजण डब्बल मास्क घालून फिरत असताना दिसून येत आहे.

कोरोना वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी डबल मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. त्याचे पालन होताना दिसून येत आहे. अनेकजण कापडी व सर्जिकल मास्क घालताना दिसून येतात.

पावसाळ्यापूर्वी फांद्या तोडाव्यात

चंद्रपूर : शहरातील विविध वार्डातील रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्या आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या फांद्या तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

कचरा नियमित उचलावा

चंद्रपूर : येथील वडगाव, समाधी वाॅर्ड, बिनबा वार्ड आदी परिसरात कचऱ्याचे ढीग असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा नियमित उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

भंगार वाहनांचा लिलाव करावा

चंद्रपूर : शासकीय कार्यालय तसेच रामनगर, सिटी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने ठेवण्यात आले आहे. या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्र द्यावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय. परंतु, लसीकणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॅार्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.

लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. आता लॉकडाऊन सुरु असल्याने या योजनांचा तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी मागणी आहे. निराधार असणाऱ्यांना शासनाकडून मासिक हजार रुपये मानधन देण्यात येते. मात्र हे मानधन येण्याची निश्चित कालावधी ठरला नसल्याने लाभार्थ्यांना बॅंकेच्या चकरा माराव्या लागतात.

कर्मचारी थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला आहे. आता कोरोनामुळे आर्थिक संकट असल्याने थकबाकी देण्याची मागणी होत आहे.

दुचाकीने शहरात भाजीपाला विक्री

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुुरू आहे. अशा स्थितीत गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या दुचाकीवरच वाॅर्डावाॅर्डात भाजीपाला विक्री सुरू केली आहे. घरोघरी जाऊन ते भाजीपाला विक्री करीत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकही बाजारात न जाता त्यांच्याकडील भाजीपाला घेण्याला पसंती देत आहेत.

शेतीच्या कामाला आला वगे

चंद्रपूर : शेती हंगामाला आता काही दिवसच राहिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. शेतीतील काडीकचरा काढण्याचे काम जोमात सुरू आहे. त्याचसोबत बँकेतील पीक कर्जांसाठीही कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या कामाला गती मिळाली आहे.

मोकळ्या जागांचा विकास करा

चंद्रपूर : शहरातील मोकळ्या जागेचा विकास करावा, अशी मागणी केली जात आहे. दोन वर्षापूर्वी काही ठिकाणी खेळण्याचे तसेच व्यायामाचे साहित्य लावून विकास केला होता. मात्र बहुतेक ठिकाणाची व्यायमाची साहित्य मोडकळीस आली आहेत. त्यामुळे त्या साहित्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

अनेक कार्यालयातील बॉयोमेट्रिक बंद

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयातील बॉयोमेट्रिक मशीन बंद आहेत. याचाच फायदा घेत कर्मचारी व अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहात नसल्याचे बघायला मिळत आहे. आता कोरोनाचे संकट असल्याने कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे. परंतु, काही कर्मचारी गौरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे

चंद्रपूर : शहरातील विविध वाॅर्डामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाईप टाळण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र वेळीच दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा

चंद्रपूर : शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. मनपाने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघर बांधण्याची गरज आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.

धान उत्पादकांना बोनस द्यावा

चंद्रपूर : राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीवर जाहीर केलेली ७०० रुपये बोनस अनेक शेतकऱ्यांची प्रलंबित आहे. कोरोनामुळे त्यांच्या घरीच राहावे लागत आहे. परिणामी आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्याची मागणी केली जात आहे.

कोरोना लढ्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत

चंद्रपूर : कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन, तहसील विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, डॉक्टर, नगरपंचायत कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या उपाययोजना आणि इतर कामे करताना त्यांची मोठी दमछाक होत आहे.

बसस्थानकावरील गर्दी वाढतेय

चंद्रपूर : कोरोनामुळे बंद असलेली बसफेरी आता सुरु झाली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे

चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये असलेल्या परकोटाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहे. त्यामुळे परकोटाचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातन विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Citizens are wearing two masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.