नागरिकांनो, पुन्हा सात दिवस धीर धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:40+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गात संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक राज्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो नागरिक जिल्ह्यात अडकून आहेत. या सर्वांना घरी जायची घाई असली तरी १४ एप्रिलपर्यंत संयम बाळगावा. त्यानंतर आवश्यक व्यवस्था केली जाईल. शासन यासाठी प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही राज्याचे मदत व पूनर्वसनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता आढावा बैठकीत बोलत होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियोजन सुरू केले. आहे. आरोग्याच्या तपासणी करताना अन्य नागरिकांना धोका होणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांची उत्तम काळजी घ्यावी, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. अन्य राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. त्या सर्वांनी त्याच ठिकाणी संयमाने राहण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयातील यंत्रणेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षालाही भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व आरोग्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
टगाला येथे ग्रामसुरक्षा दल गठित
कोरपना : तेलंगाना राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे १० पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. सदर राज्याची सीमा टागाला गावाला लागून असल्याने बाहेरील कुणीही व्यक्ती गावात येऊ नये, याठी खबरदारी म्हणून ग्रामसुरक्षा दल गठित झाली. चन्नईचे सरपंच अरुण मडावी, ग्रामरोजगार सेवक अशोक तोडसाम यांनी मार्गदर्शन केले. समितीच्या अध्यक्षपदी भीमा कोडापे, उपाध्यक्ष भीमबाई नायकुडे, सचिव भीमराव मडावी तर सदस्य पोलीस पाटील कोडापे, कानू पाटील, श्रीराम टेकाम, वनिता कोठारे, मंजू टेकाम आदींचा समावेश आहे.
साडेपाचशे व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्ण
घुग्घुस : लॉकडाऊनदरम्यान घुग्घुस परिसरात बाहेरून आलेल्या ६०३ व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने होम क्वारंटाईन केले होते. त्यापैकी ५५० जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. उर्वरित ५३ व्यक्ती अजूनही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सुटका झालेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वाकडकर यांनी दिला आहे.
घरातच उत्सव साजरा करा
एप्रिल महिन्यात सण व उत्सव एकत्र आले आहेत. सर्वधर्मीयांच्या सण-उत्सवाचा यामध्ये सहभाग असतो. मात्र ही वेळ प्रत्येकाच्या घरातील ज्येष्ठ नागरिक, मुले व आपल्या प्रियजनांची काळजी घेण्याची आहे. आरोग्याला धोका पोहोचणार नाही, यासाठी हनुमान जयंतीपासून शब-ए-बडीरात, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा आदी सण घरीच साजरी करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
जिल्ह्यात एकही पॉझिटीव्ह नाही
जिल्ह्यामध्ये सात एप्रिलपर्यंत एकही रूग्ण पॉझिटीव्ह नाही ही अतिशय चांगली बाब आहे. विदेशातून आलेल्या २०४ नागरिकांची तपासणी झाली. ते सर्व निगेटीव्ह आहेत. सोमवारी एक व्यक्ती नागपूर येथे विदेशातून आला. तिथे आरोग्य तपासणी सुरू झाली. हजरत निजामुद्दीन येथून आलेले सर्व व नागरिक निगेटीव्ह असल्याचेही ना. वडेट्टीवार यांनी आढावा बैठकीत सांगितले.
धान्य व तपासणी किट मिळणार
जिल्ह्यातील केसरी कार्डधारकांनाही सरकारी धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. याशिवाय जिल्ह्याला पुरेसे तपासणी कीट मिळणार आहेत. प्रत्येकाची तपासणी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी केले.