बंदीवानातून राष्ट्रोत्कर्षाला अपेक्षित नागरिक घडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:47 PM2019-01-27T22:47:31+5:302019-01-27T22:48:08+5:30
जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे. संयम गमावला, क्रोधावर मात करण्यास अपयश आले हेतुत: गुन्हा घडला किंबहुना अजानतेपणी अपराध झाला, यासाठी शिक्षा ही ठरलीच आहे. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण व सद्सदविवेकी वर्तणूकीतून गुन्हेगारीवर मात करावी, व राष्ट्राच्या उत्कर्षाला हातभार लावणारे नागरिक आपल्यामधून घडावे, अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगीरी बजाविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, अॅड. दत्ता हजारे, नगरसेविका शितल कुळमेथे, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
अहीर पुढे म्हणाले, काश्मिर वगळता देशातील सर्वांना कुठेही नोकरी व्यवसाय करण्याची, मुक्त जीवन, संचाराची मुभा आहे. असे असतांना आपण बंदीवानांचे जीवन का जगतो आहे, असा मनाशी विचार करण्याचा चिंतनाचा हा पवित्रा दिवस आहे असे ते म्हणाले.
भारत देश अनेक महान विभुंतीच्या परिसस्पर्शाने कर्तृत्वाने पुणीत झालेला आहे. इथे राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, गुरूनानक जन्मले त्यांची वाणी आणि विचारातून हा देश घडला आहे. त्यांच्या विचारवाणीतून अपराध मुक्त भारताची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर देशाचे स्वरूप बदलेल असे ते म्हणाले. आजच्या दिवशी प्रत्येक बंदीवान बांधवांनी प्रण करावा की, दुसºयांदा या ठिकाणी येवू तर जीवनमुल्ये शिकविणारे मार्गदर्शक म्हणूनच येऊ, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.