जमिनीच्या पट्ट्यापासून नागरिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:49 PM2018-09-29T21:49:43+5:302018-09-29T21:50:00+5:30
भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांनी जिल्हा प्रशासन व मनपाला निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
महाकाली मंदिरासमोरील झोपडपट्टीमध्ये आदिवासी व बुरड समाजातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. चांदा, मोहल्ला बाबूपेठ, शिट क्रमांक २, ब्लॉक क्रमांक १०४, न.भू. क्रमांक १४७५० मध्ये सुमारे सव्वा एकर क्षेत्रात हे कुटुंबीय ५० वर्षांपासून वास्तव्य करित आहेत. एका व्यावसायिकाच्या अरेरावीमुळे या दोन्ही लोकवस्तीमध्ये विकासाची कामेच झाली नाही. मनपाने प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले. वॉर्डातील सार्वजनिक रस्ते व नाल्यांचे पक्के बांधकाम झाले नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येते. रस्त्यांची स्वच्छता व नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणी पसरली आहे. घाणीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत घरगुती शौचालय बांधून देण्यात आले नाही. परिसरातील अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. साथीचे आजार सुरू असूनही मनपाचे आरोग्य पथक लक्ष देत नाही. पिण्याचे पाणी मिळत नाही.
त्यामुळे पाण्यासाठी दारोदार भटकंती सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा नाही. देखाव्यासाठी विद्युत खांब उभे आहेत. पण, त्यावर सर्व्हिस लाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेऊन चोºया व महिलांची छेड काढण्याच्या घटना सतत घडत आहेत. परिसरात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे टायफाईड, चिकन गुनिया, डेंग्यू व मलेरिया आजाराची लागण होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. शहरात राहूनही या परिसराला जणू वाळीत टाकण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक आहे. नागरिकांच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विविध विकासाच्या योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासन उदासिन आहे. मनपा प्रशासनाकडून सातत्याने नियमित फवारणी केली जात नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. यावेळी टेकचंद लटरे, जगदीश उके, केदार वाघाडे, रवी शास्त्री, महाकाली वोटापल्ली, पुजा हेडाऊ, सुनिता सोनकुसरे, मलया बेडेकर, अक्षय परचाके, शालीक निमगडे, संतोष मेश्राम, शंकर गेडाम व अन्य उपस्थित होते.