जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपुरात पासपोर्ट सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:52 PM2018-12-03T22:52:23+5:302018-12-03T22:52:59+5:30
पोस्टाच्या सर्व योजना असोत, रेल्वे, दूरसंचार किंवा व अन्य कोणत्याही विभागाच्या केंद्रीय योजनांच्या संदर्भातील पहिला लाभ चंद्रपूरकरांना मिळावा, यासाठी आपला प्रयत्न असून आज चंद्रपूरच्या नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्र अर्पण करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली.
चंद्रपूर : पोस्टाच्या सर्व योजना असोत, रेल्वे, दूरसंचार किंवा व अन्य कोणत्याही विभागाच्या केंद्रीय योजनांच्या संदर्भातील पहिला लाभ चंद्रपूरकरांना मिळावा, यासाठी आपला प्रयत्न असून आज चंद्रपूरच्या नागरिकांना पासपोर्ट सेवा केंद्र अर्पण करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली.
पासपोर्ट संदर्भातील आपल्या गरजेसाठी चंद्रपूर व परिसरातील जनतेला नागपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे पासपोर्ट बनविणे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळ लागणारे काम होते. तथापि, आता चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट आॅफीसमध्येच पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता चंद्रपूर डाकघरातील एका स्वतंत्र दालनात पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सोबतच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात विदेशातील नागरिकांच्या सोयी, सुविधा व पासपोर्ट संदर्भातील विभाग हाताळणारे केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये, पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक सी.एल.गौतम, वरिष्ठ पोस्टमास्टर बी. हुसेन अहमद, वरिष्ठ डाक अधीक्षक एस.एस.पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी ना. अहीर म्हणाले, केंद्रामधील सत्ता परिवर्तनानंतर बँकिंग, पोस्ट, विदेश निती या सोबतच सामान्याच्या मूलभूत गरजांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले गेले आहे. बदलत्या काळामध्ये संपूर्ण जग हे एक छोटे खेडे होत आहे. भारतातील नागरिकांना जगाच्या व्यासपीठावर उत्तम पद्धतीने आपले वर्चस्व कायम करता यावे. उद्योग, व्यवसाय, शिक्षण,उपचार सगळ्याच क्षेत्रात जगाशी नाते जोडता यावे, यासाठी मोठ्या प्रमाणात पासपोर्ट सुविधा मिळविण्याकडे या सरकारचा कल आहे. सध्या भारत पासपोर्ट उपलब्ध असणाऱ्या नागरिकांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगामध्ये यामध्ये पहिला क्रमांक नजीकच्या काळात भारत मिळवणार आहे. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा आढावा घेतला. नजीकच्या काळात रेल्वेच्या मुंबई आणि पुण्याच्या काही गाड्या लवकरच सुरू केल्या जातील, असे सूतोवाच त्यांनी केले.
विदर्भात आठ कार्यालये
नागपूर विभागामध्ये नागपूर नंतर वर्धा येथे नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता चंद्रपूर येथे हे कार्यालय सुरू होत आहे. चंद्रपूर येथे सुरु होणारे हे कार्यालय भारतातील २३८ वे कार्यालय आहे. विदर्भात एकूण आठ कार्यालय मिळाले आहेत. यानंतर अमरावती येथील कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. विदेश मंत्रालयाने देशातील नागरिकांना शिक्षण, उपचार, पर्यटन, व्यवसायासाठी जगाचे दालन खुले व्हावे यासाठी पासपोर्ट उपलब्धतेला अधिक प्राधान्य दिले आहे.
असे काढावे पासपोर्ट
ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही, त्यांना पासपोर्ट काढायचाअसेल तर ही प्रक्रिया पूर्णत: आॅनलाईन आहे. यासाठी आॅनलाईन सुविधा असणाºया केंद्राची मदत घ्यावी लागते. संबंधित वेबसाईटवर जाऊन आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आॅनलाइन पेमेंट झाल्यानंतर चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सुविधा केंद्रामध्ये कधी यायचे, याचा एसएमएस मोबाईलवर येतो. त्या तारखेला मूळ व झेरॉक्स प्रतिमध्ये कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी जावे लागते. या ठिकाणी संगणकावर छायाचित्र घेतले जाते. तसेच बोटांचे ठसे घेतले जातात. याशिवाय आपले आॅनलाईन भरलेले कागदपत्र तपासले जातात. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतात, त्या हद्दीतील पोलीस स्टेशन मार्फत चारित्र पडताळणी करण्यात येते. त्यानंतर किमान पंधरा दिवसानंतर पासपोर्ट आपल्याला मिळू शकतो.