परराज्यातील नागरिकांनाही मिळणार रेशन दुकानातून धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:00 AM2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:19+5:30
नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जागोजागी नागरिक अडकले आहे. या नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र शासनाने ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ या योजनेंतर्गत काही राज्यांसोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे या नागरिकांनाही चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलता येणार आहे. यासाठी त्यांच्याजवळ त्या राज्यातील रेशनकाडवर नाव असने गरजेचे आहे.
असे होणार अन्नधान्य वितरण
जिल्ह्यामध्ये मे २०२० मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड २ रुपये प्रती किलो दराने गहू १५ किलो, ३ रुपये प्रति किलो दराने तांदूळ २० किलो तर २० रुपये प्रति किलो दराने एक किलो साखर मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ रुपये प्रति किलो दराने गहू ३ किलो, २ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ मिळणार आहे.
कार्ड नसलेल्यांना रहावे लागणार वचिंत
कार्डधारकांनी दुकानात धान्य घेताना सामाजिक अंतर तसेच मास्क घालणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनी चौकशी करण्याकरिता रास्तभाव दुकानात जाऊन त्रास देवून नये, त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधावा. रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदारांना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांच्यावर दबाव आणू नये.
- राजेंद्र मिस्किन,
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर
आधार लिंकिंग आवश्यक
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजेच, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच दुकाने उघडे ठेवावे लागणार आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार मे-२०२० महिन्यात धान्य वाटप करताना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारक लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्यांचे नाव रेशनकार्डवर आहे व आधार क्रमांक नोंदवलेला आहे अशाच व्यक्तींना धान्य मिळणार आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाºया प्रत्येक लाभार्थ्यांकरिता हात धुण्याकरिता साबण व पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
प्राधान्य कुटुंबांनाही धान्य
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत म्हणजेच, एका कार्डवर ४ व्यक्ती असतील तर त्यांना २० किलो तांदुळ मोफत मिळणार आहे. मे -२०२० महिन्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर १ किलो डाळ (चणाडाळ/तुरडाळ) यापैकी जी उपलब्ध असेल ती मोफत मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमित धान्य विकत घ्यावे लागणार आहे. धान्य घेतल्यानंतर त्यांना १ किलो डाळ व तांदुळ मानसी ५ किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे. केशरी कार्ड धारकांना मे महिन्यात प्रति मानसी ३ किलो गहु ८ रुपये प्रति किलो व २ किलो तांदुळ १२ रुपये प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे, त्याच दुकानातून मिळणार आहे.