आठवडी बाजारांचा नागरिकांना पडतोय विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:25+5:302021-05-20T04:30:25+5:30
चंद्रपूर : गाव तेथे दुकान आणि मोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार असतो. आठ-दहा गावांसाठी, त्या परिसरात आठवडी बाजार भरविण्याची परंपरा ...
चंद्रपूर : गाव तेथे दुकान आणि मोठ्या गावांमध्ये आठवडी बाजार असतो. आठ-दहा गावांसाठी, त्या परिसरात आठवडी बाजार भरविण्याची परंपरा आहे. गाव, निमशहर या ठिकाणी आठवड्यातील ठरलेल्या दिवशी आठवडी बाजार भरतोच. मात्र कोरोनामुळे या सर्वांवर निर्बंध आल्याने आठवडी बाजार बंद झाले आहे. परिणामी नागरिक आता आठवडी बाजारच विसरले आहेत.
कोरोनामुळे दुकाननोकरांचे हाल
चंद्रपूर : कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दुकान व्यावसायिकांसह त्यांच्या नोकरांचीही मोठी फजिती होत आहे. असंघटित असलेल्या या नोकरांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.
प्रलंबित बोनस देण्याची मागणी
चंद्रपूर : राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीवर जाहीर केलेला अनेक शेतकऱ्यांचा ७०० रुपये बोनस प्रलंबित आहे. कोरोनामुळे त्यांना त्यांच्या घरीच राहावे लागत आहे. परिणामी आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्याची मागणी केली जात आहे.
शेणखत उचलण्यासाठी लगबग सुरू
चंद्रपूर : पावसाळा अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतकामात मग्न आहे; तर काही शेतकरी सध्या शेतात शेणखत टाकत आहे. त्यामुळे गावाच्या वेशीवरील परिसर स्वच्छ झाल्याचे दिसत आहे.
कमी मजुरांत शेतीची कामे सुरू
चंद्रपूर : पावसाळा अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. मात्र कोरोनाची दहशत असल्याने सोशल डिस्टन्स पाळून कमी मजुरांच्या भरोशावर शेतात काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आझाद बागेतील चिवचिवाट वाढला
चंद्रपूर : कोरोनामुळे घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे नियमित बागेमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्यांची कुचंबना झाली आहे. दरम्यान, आझाद बागेतील पक्षी मोकळा श्वास घेत असून सध्या चिवचिवाटही वाढला आहे.
लग्नातील अनावश्यक खर्च टळला
चंद्रपूर : कोरोनाचे संकट लग्नातील चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी यशस्वी ठरले आहे. कोरोनामुळे या वर्षीच्या लग्नसराईत घरगुती व साध्या पद्धतीने विवाह साजरे होत आहे. परिणामी लग्नातील अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात टळत आहे.
कोणाच्या घरातील लग्न मोठे होणार, या एकमेकातील ईर्षेमुळे लग्नसमारंभात लाखो रुपयांचा चुराडा होत आहे.
घराघरांत बनताहेत उन्हाळी मेवा
चंद्रपूर : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र चंद्रपूर शहर व परिसरातील महिला उन्हाळी मेवा म्हणजे पापड, कुरडया, शेवया बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे पुरुष मंडळी घरातच असल्यामुळे त्यांचाही या कामासाठी मोठा हातभार लागत आहे. घरकामात मदत व्हावी आणि टाईमपासही व्हावा म्हणूनच सर्व सदस्य मिळून पापड, कुरडया, चिप्स, शेवया, आदी पदार्थ बनविण्यात गुंग दिसून येत आहेत.
‘त्या’ डबक्याने आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॉलनी परिसरातील शीलवंत बुद्धविहार परिसरात पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्यामुळे या परिसरात डासांची उत्पत्ती होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत अनेकदा महापालिकेला निवेदन देण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
रुग्ण वाढल्याने गावातील कट्टे बंद
चंद्रपूर : मागील काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे गावात कट्ट्यांवर जमणारी गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. इतर वेळी सायंकाळी तसेच सकाळी चर्चा करण्यासाठी येणारे नागरिक आता आपल्या घरात राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे चौक सध्या निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात माकडांचा धुमाकूळ
चंद्रपूर : ग्रामीण भागात वेलूची घरे बघायला मिळतात. मात्र वादळ व माकडांच्या हैदोसामुळे वेलूची नासधूस होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे माकडे पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणात गावात येत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कसवसुलीला कोरोनाचा फटका
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. याचा परिणाम महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करवसुलीवर झाला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची तिजोरी रिकामी आहे. याचा फटका सामान्य निधीतून होणाऱ्या विकासकामांना बसणार आहे.
लाईनमनची पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. बहुतांश तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. त्यामुळे लाईनमनची पदे भरण्याची मागणी होत आहे.
‘बीएसएनएल’चे टॉवर वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.