गडचांदूर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:50 PM2018-02-11T23:50:50+5:302018-02-11T23:51:27+5:30
महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड पहाडाच्या निसर्गरम्य परिसरातील अंमलनाला धरणाजवळील नोकारी (खुर्द) येथे १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान श्री शंकर देवाची यात्रा भरणार आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड पहाडाच्या निसर्गरम्य परिसरातील अंमलनाला धरणाजवळील नोकारी (खुर्द) येथे १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान श्री शंकर देवाची यात्रा भरणार आहे. गेल्या काही वर्षापासून देवस्थान ट्रस्टमध्ये वादविवाद सुरू असून शुक्रवारी या वादविवादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
या मारहाणीत शंकर देवस्थान सेवा समिती नोकारी (खु) चे अध्यक्ष मोतीलाल शांताराम बदकी (४८) हे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिताराम बदकी हेदेखील जखमी आहेत. प्राणघातक हल्ला करणाºया सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नोकारी येथील शेकडो नागरिकांनी गडचांदूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
ठाणेदार विनोद रोकडे यांनी वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिक परत गेले.
शंकर देवाची यात्रा असल्याने साफसफाई करण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शंकर देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष मोतीलाल बदकी यांनी मंदिर परिसरात मजूर पाठविले. मात्र आरोपी मोतीलाल मंगाम, शंकर मंगाम, त्यांची पत्नी व मुले यांनी मजूराला काम करु दिले नाही व परत पाठविले. मजुरांनी मोतीलाल बदकी यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा स्वत: मोतीलाल बदकी व त्यांचा भाऊ सिताराम बदकी व समितीचे सदस्य मंदिराजवळ आले असता वादविवाद सुरु झाला व मोतीलाल बदकी यांच्यावर आरोपींनी हल्ला केला. दगडांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मोतीलाल यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस स्टेशन गडचांदूरला घटनेची तक्रार नोंदविण्यात आली. गडचांदूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी नोकारी येथील शेकडो पुरुष महिलांनी गडचांदूर पो.स्टे.वर मोर्चा नेला. ठाणेदार विनोद रोकडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात येईल असे आश्वासन दले. शंकर देव यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नोकारीवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यात्रेदरम्यान जादा बसेसची व्यवस्था
श्री शंकर देवाची यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून या यात्रेत गडचांदूर तथा परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांच्या सेवेसाठी गडचांदूर, राजुरा येथून एसटी महामंडळाने स्पेशल बसची व्यवस्था केली आहे. गडचांदूर बसस्टॅड तसेच भाजी मार्केट येथून बसेस, खासगी वाहने सोडण्यात येईल.
यात्रेदरम्यान वनविभाग, पोलीस विभागातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून यात्रा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
- विनोद रोकडे, ठाणेदार