उपगन्लावार ले-आऊटमधील रस्त्याचे बांधकाम नागरिकांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:05 AM2019-05-16T00:05:07+5:302019-05-16T00:06:10+5:30
शहरातील अनेक वार्डांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. असाच रस्ता तुकूम परिसरातील उपगन्लावार ले-आऊटमध्ये सुद्धा तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामावरून आता नागरिक आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरु झाल्याने नागरिकांनी या रस्त्याचे बांधकाम रोखले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील अनेक वार्डांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. असाच रस्ता तुकूम परिसरातील उपगन्लावार ले-आऊटमध्ये सुद्धा तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामावरून आता नागरिक आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरु झाल्याने नागरिकांनी या रस्त्याचे बांधकाम रोखले आहे.
या रस्त्यांच्या बांधकामाला महापालिकेने मंजुरी देताना नागरिकांना खूश करण्यासाठी केवळ अर्ध्याच रस्त्याला मंजुरी दिल्याचे समजते. मंजुरीनुसार कंत्राटदाराने बांधकाम सुरु केले. मात्र सदर रस्त्याचे अर्धेच बांधकाम होणार असल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. या प्रकारामुळे मात्र महापालिका पदाधिकाऱ्यांवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्यासाठी कंत्राटदाराने १५ दिवसांपासून रस्त्याच्या अगदी मधोमध रेती, गिट्टी आणून टाकली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात या रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. यासाठी प्रथम कंत्राटदाराने गिट्टी, रेती, सिमेंटचा थर पसरविला. मात्र सदर रस्ताचे बांधकाम एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत करण्याऐवजी अर्ध्येच केले. दुसºया लेअरसाठी गिट्टी, रेती टाकण्याचे काम सुरू करण्यापूर्वी येथील नागरिकांनी पूर्ण रस्त्यावर प्रथम लेअर टाकण्याची मागणी केली. मात्र कंत्राटदाराने पूर्ण रस्ता तयार करण्यास नकार दिला. जोपर्यंत या रस्त्याचे पूर्णपणे सिमेंटीकरण करण्यात येणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
बांधकाम साहित्यामुळे अपघाताची शक्यता
हा रस्त्या तयार करण्यासाठी कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात रेती, गिट्टी आणली असून ती रस्त्यावर टाकली आहे. विशेष म्हणजे, यातील अर्र्ध्यीच गिट्टी आणि रेतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जाता-येताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकतर रस्ता बनवून मोकळा करा किंवा रस्त्यावरील गिट्टी, रेती उचलून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पालिकेचा मतांवर डोळा
सदर रस्त्याची मंजुरी देताना पूर्ण रस्त्याला न देता केवळ अर्ध्या रस्त्यालाच मंजुरी देण्यात आली. यामागे महापालिका पदाधिकाऱ्यांचा राजकीय हेतू असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका पदाधिकारी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून अर्ध्या रस्त्याला मंजुरी देऊन विकास कामाचा आव आणल्याचे बोलल्या जात आहे.
रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. आचारसंहिता संपताच या रस्त्यासाठी आणखी निधी मंजूर करवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्ण रस्ता तयार करण्यात येणार आहे.
- सोपान वायकर, नगरसेवक
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
मागील पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले आहे. ऐेरवी एखाद्या नागरिकांनी रस्त्यावर थोडेजरी बांधकाम साहित्य ठेवले तर महापालिका प्रशासन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारतात. मात्र पंधरा दिवसांपासून बांधकाम साहित्यामुळे येथे रस्ता अडवून ठेवला असतानाही महापालिका प्रशासनाला जाग कशी काय येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.