नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासकीय धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:52 PM2018-08-27T22:52:42+5:302018-08-27T22:53:09+5:30
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश तापाने या महिनाभरात अनेकांचा बळी गेला आहे. शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी नानाविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जातो. मात्र जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात या योजना फाईलीत गुंडाळून नागरिकांना आजारांच्या खाईत लोटण्याचे संतापजनक प्रकार होत आहे. डेंग्यू, मलेरियाच्या डासांना हद्दपार करणाऱ्या फागिंग मशीन्सबाबत जिल्हा परिषदेने हाच कित्ता गिरवला आहे. अनेक गावातील फॉगिंग मशीन्स बंद असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाला साधा डास चावल्याची जाणीव होऊ नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. मुंबईच्या मंत्रालयातून येणाºया विविध विभागातील योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे युध्दस्तरीय काम होत असते. मात्र अलिकडे हे मिनी मंत्रालय डस्टबीनसारखेच काम करीत असल्याचे दिसून येत आहे. आल्या योजना की गुंडाळल्या फाईलीत असेच समीकरण सुरू आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे वृत्त जिल्ह्यातील अनेक गावांमधून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव आरोग्य केंद्रांतर्गत एक जण डेंग्यू पाजिटीव्ह निघाला. आणखी अनेक गावात असे रुग्ण असण्याची शक्यता आहे.
साथीचे आजार पसरल्याची तक्रार आली की जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग केवळ शिबिर लावून मोकळे होतात, असा अनुभव आहे. डासांचा नाईनाट करणाºया फॉगिंग मशीन्सचा पुरवठा शासनाने गावागावांमध्ये केला. केवळ मशीन्स पुरवून प्रशासन गप्प बसले. प्रत्यक्षात या मशीन्स धूळखात आहे. नागरिकांचे स्वास्थ बिघडत आहे. केवळ कागदोपत्री या मशीन्स वाटून प्रशासन धन्यता मानत असली तरी दुसरीकडे डासांनी आपले काम सुरू ठेवले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत नागरिकांचे बळी जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यामधील गावांमध्ये असलेल्या फॉगिंग मशीन्स बंद असल्याची माहिती आहे. बोटावर मोजण्याइतक्या शहरातील फॉगिंग मशीन्स सुरू आहेत. मात्र त्याचा उपयोग होताना दिसत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
फवारणी करणारे प्रशिक्षकच नाही
जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीन्स देऊन मोकळे झाले. मात्र या फॉगिंग मशीन्स हाताळण्याचे प्रशिक्षण ग्रामपंचायत स्तरावर अनेकांकडे नाही. जिल्हा परिषदेने फॉगिंग मशीन्स देताना फवारणी करण्याचे प्रशिक्षण देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे मशीन्स देऊनही अनेक ठिकाणी फवारणी होताना दिसत नाही.
चंद्रपूर स्वच्छ; तरीही डासांचा प्रकोप
मागील दीड वर्षात चंद्रपूर बºयापैकी स्वच्छ झाले. घराघरातून कचरा संकलित होत आहे. मात्र अनेक ठिकाणी नाल्यांची समस्या आहे. काही वस्त्यांमध्ये नाल्याच नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. त्यातही अनेक भागात औषधांची फवारणी होत नाही. त्यामुळे चंद्रपुरातही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जवळजवळ संपूर्ण शहरातील वॉर्डांमध्ये डासांनी आपला उत्पात मांडला आहे.