दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी
By admin | Published: April 26, 2017 12:46 AM2017-04-26T00:46:11+5:302017-04-26T00:46:11+5:30
गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुक्तापूर (महागाव) येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला.
मुक्तापुरात जनजागरण मेळावा : शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे व सातबाराचे वितरण
अहेरी : गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुक्तापूर (महागाव) येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान झालेल्या आरोग्य शिबिरात दुर्गम भागातील जवळपास दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, भूमिअभिलेख कार्यालयाचे संतोष तिरेले, पशुवैैद्यकीय अधिकारी शिंदे, वैैद्यकीय अधिकारी बिश्वास, वनरक्षक घुटे, तलाठी पठाण, ग्रामसेविका भैसारे, प्रकाश दुर्गे, दीपक सुनतकर, कृषी सहायक नंदेश्वर, पोलीस पाटील चंद्रकला कोडापे, सरपंच रमेश मडावी, श्रीहरी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात महसूल, कृषी, आरोग्य, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, शिक्षण, पशुसंवर्धन, भूमिअभिलेख विभागाच्या वतीने स्टॉल लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. सदर मेळाव्यात मुक्तापूर, महागाव, इतलचेरू या गावातील काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे व सातबाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रांगोळी, मॅराथॉन, चित्रकला, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस प्रशासनातर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुक्तापूर येथील ग्रामस्थांना दैनंदिन जीवनापयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. मोबाईल पॅथॉलॉजी युनिट अहेरी व प्राथमिक आरोग्य केंद्र महागावतर्फे सिकलसेल, बीपी व मधुमेह तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा बिश्वास, दीप्ती कोहळे, ललीता उसेंडी, सुनीता पुंघाटी, महागाव पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता गजाटेड्डीवार, सिंधू रायसिडाम यांनी सेवा दिली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संजय मोरे, संचालन पोलीस उपनिरीक्षक कुणाल दुरड यांनी केले तर आभार संतोष पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)
योजनेच्या लाभातून प्रगती साधा
शासनाच्या विविध विभागातर्फे गाव विकास व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी पोलीस प्रशासनही आवश्यक ती मदत करेल. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांनी शासकीय योजनाचा लाभ घेऊन आपले कुटुंब व गावाची प्रगती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी मार्गदर्शनात केले.