उकाड्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 21, 2014 11:47 PM2014-08-21T23:47:31+5:302014-08-21T23:47:31+5:30
पाऊस नसल्याने याचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
रत्नाकर चटप - लखमापूर
पाऊस नसल्याने याचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला. परंतु पावसाचा जोर नसल्याने वातावरणात उकाडा दिसून येत आहे. गरमीचे प्रमाण वाढत असून ताप खोकला, सर्दी, हातपायाचे दुखणे, श्वसनाचे रोग आदी आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याचा मोठा परिणाम लहान मुलांवर होतांना दिसत आहे.
नियमित पाऊस पडत नसल्याने आता काही नागरिक कुलरचा वापर करीत असून उन्हाळा लागला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच काही गावांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसत असून सांडपाणी वाहत आहे तर नाल्या तुंबून आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्याने नाल्याची स्वच्छता होवून सांडपाणी गावाबाहेर निघत असे. परंतु अनेक गावात यामुळे रोगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. असाच परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. यातील अनेक रुग्ण उपचारासाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जाताना दिसत आहे. यामध्ये अनेकांना भरती करुन आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने डॉक्टरांची तारांबळ उडताना दिसत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होवून उष्णतेचे प्रमाण कमी होत असते. परंतु आता पाऊसच नसल्याने याचा परिणाम उलट होतांना दिसत आहे. उकाळ्यामुळे व फळ भाजीपाला महागल्याने आहारावरही परिणाम होत आहे.
घराघरात पंखा व कुलर उन्हाळ्याप्रमाणे सुरु असून गरमीपासून सुटका करण्याचे प्रयत्न नागरिक करीत असले तरी पावसाशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार भर उन्हात काम करीत असल्याने अशा रुग्णांची संख्या रुग्णालयात अधिक प्रमाणात दिसत आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले वातावरण असावे असे म्हटले जाते परंतु पावसाच्या ऋतुत दृष्काळाचा सामना करताना आता नागरिकांना आरोग्याचाही सामना करावा लागत आहे.
आधीच महागाई वाढली असताना पुन्हा विविध आजार आर्थिक स्थिती डबघाईत आणत आहे. तेव्हा वरुणराजाची कृपा होईल काय, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून आपले आरोग्य जपण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहे.