उद्ध्वस्त किल्ल्यासाठी नागरिकांचा पुढाकार

By admin | Published: July 25, 2016 01:16 AM2016-07-25T01:16:58+5:302016-07-25T01:16:58+5:30

शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे.

Citizen's initiative for the destroyed fort | उद्ध्वस्त किल्ल्यासाठी नागरिकांचा पुढाकार

उद्ध्वस्त किल्ल्यासाठी नागरिकांचा पुढाकार

Next

पुरातत्व विभागाला निवेदन : किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी
मिलिंद कीर्ती चंद्रपूर
शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे. ही ओळख कायम राहावी आणि ऐतिहासिक पुरातन वारशाची जपणूक व्हावी, यासाठी आंबेकर ले-आऊटमधील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभाग, खासदार, आमदार व चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन उद्ध्वस्त वारसा पुन्हा उभा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बल्लारपूर, चंद्रपूर आणि नागपूर ही गोंड राजांची वारसा स्थळे आहेत. या तिन्ही शहरांमध्ये गोंड राजांनी बांधलेले किल्ले आहेत. मोगलांच्या मांडलिकत्वाखाली या भागात गोंड राजांची भरभराट झाली होती. गोंड संस्कृती आणि मोगल संस्कृतीचा मिलाफ असलेल्या काही वास्तू, शिल्पे गोंड राजांनी उभी केली होती. त्यांचा ऐतिहासिक पुरावा नागपूर, चंद्रपूर व बल्लारशाहा येथील गोंडराजाचे किल्ले आहे. मात्र या तिन्ही शहरातील किल्ल्यांची पुरातत्व विभागाने निगा राखली नाही. परिणामी तिन्ही ठिकाणच्या किल्ल्यांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. बल्लारपूर नगर परिषद बल्लारशाहा किल्ल्याचा वारसा जपण्याबाबत विचार करीत आहे. इरई नदीच्या काठावरील किल्ला परिसर विकसित करण्याचा विषय मुख्याधिकारी विपीन मुधा यांनी अग्रक्रमावर घेतला आहे. तसा प्रयत्न चंद्रपुरातही करता येणे शक्य आहे.
चंद्रपूर येथील गोंडराजाच्या किल्ल्याचे अवशेष म्हणजे शहराच्या सभोवताल परकोट शाबूत आहे. पण या परकोटावरही काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी परकोट उद्ध्वस्त झाल्याचा फायदा घेऊन परकोटाच्या भिंतीवर बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे पुरातत्व विभागाने साफ दुर्लक्ष चालविले आहे. किल्ल्यावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर मनपा अतिक्रमणधारकांकडून कर वसुली करून त्या अतिक्रमणाला वैधता प्राप्त करून देत आहे. पण मनपा व पुरातत्व विभागांनी ठरविले तर किल्ल्यातील अतिक्रमण थांबविणे शक्य आहे.
किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम चंद्रपूरचे नागरिकदेखील करू शकतात. नागरिकांनी आपापल्या परिसरातील अतिक्रमणाविरोधात आवाज उठविला तर चंद्रपूर महानगरपालिकेलाही त्याची दखल घ्यावी लागेल. शेवटी आपला इतिहास जपण्याची जबाबदारी तो इतिहास घडविणाऱ्या नागरिकांचीच असते, त्यांच्या वंशजांची असते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आंबेकर ले-आऊट परिसरातील किल्ल्यावरील अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पुरातत्व विभाग आणि चंद्रपूर मनपा आयुक्तांना नुकतेच निवेदन सादर केले आहे. निवेदनात नागरिकांनी चोर खिडकी ते पाण्याची टाकीपर्यंत ढासळलेल्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर आनंद कवाडे, जितेंद्र रायपुरे, मो. फारूख मो. हारूण, परवन नदीम शेख, वाय. के. यासन, वसीम जीना, अय्युब खान, तारिक अहमद आणि डॉ. इसादास भडके आदींच्या स्वाक्षरी आहे.

Web Title: Citizen's initiative for the destroyed fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.