जननी सुरक्षा योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद
By admin | Published: November 22, 2014 10:59 PM2014-11-22T22:59:14+5:302014-11-22T22:59:14+5:30
केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत असल्याने नागरिकांचा या योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांचीही उदासीनता असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.
या योजनेंतर्गत बाळंतिणीला ७०० रुपये मदत दिली जाते. रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याचा तसेच ये-जा करण्याकरिता येत असलेला खर्च याकरिता ६०० रुपये दिले जातात. परंतु ही मदत गर्भवती महिलेकरिता कमी पडत असल्याने नाराजी व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या वतीने जननी सुरक्षा योजनेंतर्गत अर्थसहाय्य वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष व ग्रामीण भागातून मिळत असलेला अल्प प्रतिसाद यामुळे या योजनेचे सार्थक किती प्रमाणात झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्राच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ आता मातांना दोनपेक्षा अधिक अपत्यांसाठीही मिळत आहे. तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने लाभार्थी माताच्या वयासाठीची १९ वर्षाची अटही शिथिल केली आहे. यामुळे दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीतील गर्भवती महिला शासकीय दवाखान्यात बाळंत होऊन माता व अर्भक मृत्यू दर कमी होण्यास हातभार लागू शकेल, असा उद्देश होता. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी सातशे रूपयांची तुटपुंजी रक्कम वाढवण्याची मागणी आहे. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने ८ मे २०१३ रोजी परिपत्रक काढून सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)