वाघाच्या बंदोबस्तासाठी आठ गावांतील नागरिक झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 05:00 AM2022-06-22T05:00:00+5:302022-06-22T05:00:14+5:30
शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावालगतच्या जंगलात वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याकरिता जावेच लागते. त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारत असल्याचा आरोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मागील आठवड्यात हळदा येथे दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला, तर एक शेतकरी कसाबसा बचावला. हळदासह परिसरातील जनतेमध्ये वन विभागाप्रति तीव्र असंतोष निर्माण झाला होता. पाच दिवस उलटूनही त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही. ठोस उपाययोजनाही करण्यात आल्या नाही. अखेर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालय व वनविभाग कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने व धरणे आंदोलन केले. घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली, मुडझा, बलारपूर, आवळगाव, वांद्रा, चिचगावसह अनेक गावे मोठ्या जंगलालगत वसलेली आहेत. लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावालगतच्या जंगलात वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याकरिता जावेच लागते. त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव विनोद झोडगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. महेश कोपुलवार, महेंद्र ज्ञानवाडकर, हळदा येथील माजी उपसरपंच संजय लोणारे, ग्रामपंचायत सदस्य धनराज लोणारे, कालिदास इटनकर, ज्ञानेश्वर झरकर, मीनाक्षी गेडाम, रुपाली नखाते, सविता कामडी, लोमेश चदनखेडे, पीतांबर म्हस्के, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, ग्रामपंचायत सदस्य उसन ठाकरे, कुडेसावलीचे सरपंच चक्रधर गुरनुले व गावकरी उपस्थित होते. वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, ठाणेदार रोशनकुमार यादव यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त होता.