मनपाच्या कारवाईला नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:07 AM2018-05-06T00:07:17+5:302018-05-06T00:07:17+5:30
येथील प्रभाग क्रमांक १६ येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासंदर्भात मनपाची परवानगी घेऊन बोअरवेलच्या खोदकामाला सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील प्रभाग क्रमांक १६ येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासंदर्भात मनपाची परवानगी घेऊन बोअरवेलच्या खोदकामाला सुरुवात केली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर मनपाची परवानगी न घेतल्याचे कारण पुढे करुन मनपाचे पथक जप्ती करण्यास प्रभागात दाखल आले. मात्र प्रभागातील नागरिकांनी जप्तीला विरोध केल्यामुळे कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. येथे नळाचे पाणी नियमित येत नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून बोअरवेल उभारण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला. त्यानुसार काम सुरू केले. मात्र, परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवून मनपा प्रशासनाने काही दिवसाअगोदर साहित्य जप्त करून आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
त्यानंतर नागरिकांनी मनपा अधिकाºयांची भेट घेतली. पाणी समस्यमुळे होत असलेला त्रास कथन केला. त्यानंतर लोकवर्गणीतील बोअरवेल पूर्णत्वास येताच मनपाकडे हस्तांतरण करण्यात येईल, असा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मनपाने होकार दिला. बोअरवेलचे काम पूर्ण करण्याबाबतचे पत्रही दिले. यानंतर नागरिकांनी अपूर्ण काम पूर्ण केले. मात्र, शुक्रवारी अचानक मनपाचे कर्मचारी जप्तीसाठी धडकले. मात्र मनपाची परवानगी घेऊनही मनपा कर्मचारी जप्तीसाठी आल्याने माजी नरगसेविका रत्नमाला बावणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या कार्यवाहीला विरोध केला. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र मनपाने पूर्वी परवानगी दिली. नंतर ते काम जप्त करण्यास आल्याने परिसरातील नागरिकांकडून मनपा पदाधिकाºयांबद्दल रोष व्यक्त होत आहे