पळसगाव,गोंडमोहाडी येथील नागरिक वाघाच्या दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:51+5:302021-06-25T04:20:51+5:30
वाघिणीच्या दहशतीने शेतकऱ्यांचे शेतावर जाणे बंद पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव येथे ...
वाघिणीच्या दहशतीने शेतकऱ्यांचे शेतावर जाणे बंद
पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव येथे गावला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या तलावाजवळील झुडपात वाघीण व वाघिणीच्या बछड्याने एक गोरा ठार केला. वाघिणीच्या हल्ल्यात एक इसम व वनकर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेनंतर पळसगाव व गोंडमोहाडी येथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. शेतीचा हंगाम असतानाही शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.
रात्रभर वनविभागाच्या विशेष कृती दलाचे जवान, गावातील ग्राम सुरक्षा दल, वनमजूर या परिसरात पहारा देत आहेत. १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पळसगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाघीण गावाच्या दिशेने जाऊ नये म्हणून बांबूचे ताटवे लावण्यात आले आहे. मात्र वाघीण तिथेच असल्याने पळसगाव, गोंडमोहाळी परिसरात दहशत कायम असून नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरातील एक शेतकरी गुरुवारी शेतावर गेला नाही. शेतीचा हंगाम सुरू असून वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग घरातच आहे. अजूनही गावकरी वाघीण गावाच्या शेजारीच असल्याचे सांगत आहेत. गावातील नागरिकांनी वाघाच्या पगमार्कचे निरीक्षण केले असता फक्त एकच वाघ या परिसरातून जंगलात गेल्याचे सांगितले जात आहे. वाघीण आणि तिच्या बछड्यापासून गावकरी यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
हंगामाचे कसे होईल?
सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. आता पाऊस पडून गेल्याने पेरण्याची लगबग सुरू आहे. अशावेळी शेतात दिवसभर राबण्याची हीच खरी वेळ आहे. मात्र वाघीण व तिच्या बछड्यामुळे शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. आणखी काही दिवस असेच सुरू राहिले तर हंगामाचे कसे होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कोट
वाघाला माणसांनी मारले तर तो गुन्हा ठरतो. मात्र वाघ माणसाला मारतो, हा निसर्गनियम कसा? गावाच्या शेजारी वाघीण व बछडे असतानाही वनविभाग ठोस पावले उचलायला तयार नाही. आधी जंगलशेजारी वाघ भेटायचे, आता अगदीच गावात आलेत. यावर्षी शेतीचा हंगाम कसा करावा ? वनविभागाने तत्काळ वाघिणीला जेरबंद करावे.
ॲड. भूपेश वामनराव पाटील,
शेतकरी,पळसगाव.
===Photopath===
240621\img-20210624-wa0128.jpg
===Caption===
घटनास्थळाची पाहणी करताना ए बी जाधव सहाय्यक वनसुरक्षक,ठेमस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी