इंधन दरवाढीने नागरिकांची सरपणासाठी जंगलात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:40+5:302021-09-08T04:33:40+5:30
ब्रह्मपुरी : केंद्र शासनाने इंधन व गॅसच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने आतापर्यंतच्या सर्व चूलमुक्तीसाठी अमलात आणलेल्या योजना कुचकामी ...
ब्रह्मपुरी : केंद्र शासनाने इंधन व गॅसच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने आतापर्यंतच्या सर्व चूलमुक्तीसाठी अमलात आणलेल्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गॅसच्या दरवाढीने जंगलात सरपण गोळा करण्याकरिता ग्रामीण भागातील नागरिक धाव घेत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे हल्ले वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
डिझेल, पेट्रोलपाठोपाठ घरगुती गॅसच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आपसूकच वाढल्या आहेत. तालुक्याचा परीघ फार मोठा असून तालुक्यातील ७५ टक्के जनता जंगलव्याप्त भागात वास्तव्यास आहे. दोन वेळ चुलीवर स्वयंपाक केल्याने गृहिणींच्या प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. केंद्र शासनाने चूलमुक्तीसाठी उज्ज्वला गॅस योजनासारख्या विविध योजना राबविल्या. या योजनांद्वारे स्वस्त दरात ग्रामीण भागात गॅस उपलब्ध करून देण्यात आला.
ब्रह्मपुरी वनविभाग विस्तीर्ण पसरला असून, वाघ व बिबट यांच्यासह मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. त्यामुळे सरपण गोळा करण्यासाठी किंवा गुरे चारण्यासाठी जंगलात नागरिक गेले असता वन्य प्राणी - मानव संघर्षाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यात बऱ्याच नागरिकांना प्राणास मुकावे लागले असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
इंधन दरवाढ व गॅसच्या किमती भरमसाट वाढल्याने ग्रामीण भागातील जनतेला ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शासनाच्या उज्ज्वल योजनेसारख्या विविध योजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे परत एकदा ग्रामीण जनतेला नाइलाजाने सरपणासाठी जंगलात जावे लागते. त्यामुळे मानव व वन्य प्राणी यांचा संघर्ष वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या काळात वन्य प्राण्यांचे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.