सर्पदंशाच्या घटना टाळण्यास नागरिकांनी पाळावी दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:00+5:30
घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाजूला झाडाच्या फांद्या आल्या असल्यास त्या कापून टाकाव्यात. दारावरील तसेच भिंतीवरील भेगा बुजवाव्यात, अंधारात घराबाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये, खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात व त्यांना खाण्यासाठी साप येतात. जंगलात किंवा शेतातून फिरताना पायात नेहमी बुट वापरावे, डोक्यावर टोपीचा वापर करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मान्सून बरसला आहे. सोमवारपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी पाळावी, असे आवाहन सर्पमित्र उमेशसिंग झिरे (मूल) व संतोष कोरडे (शंकरपूर) यांनी केले आहे.
घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाजूला झाडाच्या फांद्या आल्या असल्यास त्या कापून टाकाव्यात. दारावरील तसेच भिंतीवरील भेगा बुजवाव्यात, अंधारात घराबाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, खरकटे अन्न घराजवळ टाकू नये, खरकटे अन्न खाण्यासाठी उंदीर येतात व त्यांना खाण्यासाठी साप येतात. जंगलात किंवा शेतातून फिरताना पायात नेहमी बुट वापरावे, डोक्यावर टोपीचा वापर करावा. वाढलेल्या गवतातून जाणे शक्यतो टाळाव्यात अशा सूचना सर्पमित्र उमेशसिंग झिरे यांनी दिल्या. संतोष कोरडे म्हणाले, अडचणीच्या ठिकाणी किंवा अंधारात एखादी वस्तू शोधताना बॅटरी किंवा काठीचा आधार घ्यावा. जंगलात किंवा वाटेत दिसलेल्या सापाला उगाच मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याला त्याच्या वाटेने सुखरूप जाऊ द्यावे, दाराची फट योग्य प्रकारे बंद करून ठेवावी, विटा, दगडाचे ढिगारे व पालापाचोळा साफ करताना काळजी घेवून साफ करावे, कोंबड्या, कबुत्तर, पोपट, ससे, आदी घरापासून दूर व उंचावर ठेवावेत. महिलांनी घर सावरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
दंश करून साप करतो स्वरक्षण
साप स्वत:हून कधीच दंश करीत नाही. त्याला स्वत:ला असुरक्षित वाटले तरच दंश करतो. त्यामुळे सापाच्या वाटेला जाणूनबुजून जाण्याचा प्रयत्न करू नये. रात्री झोपतेवेळी अंगावरुन साप गेला तरी तो दंश करीत नाही. मात्र अंगावर साप आल्यास आपण हलतो, त्यावेळी सापाला असुरक्षित वाटते व तो दंश करतो. रात्रीच्या सुमारास आपले भक्ष्य शोधण्यासाठी साप बाहेर निघतो. घराचा दरवाजा, खिडक्या या अतिशय व्यवस्थित बसलेल्या असाव्यात. एखाद्या ठिकाणी फट असल्यास ती फट बुजविणे आवश्यक आहे, अशी माहिती सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांनी दिली.