विकासासाठी नागरिकांनी योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:34 PM2018-10-14T22:34:45+5:302018-10-14T22:35:13+5:30
कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर रोडवरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करताना येथील ज्येष्ठ नागरिकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या बगीच्याची जबाबदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी असेच नागरिकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या समित्या तयार करुन रस्ते तर सौदर्यीकरण यांच्या दर्जाची काळजी व देखभाल समितीकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी चंद्रपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्याची तिजोरी ज्यांच्या हाती आहेत असे वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नगरसेवकांकडून आलेल्या कोणत्याही सकारात्मक व दर्जात्मक प्रस्तावाला निधी मिळू शकतो. त्यामुळे झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती जयश्री जुमडे, नगर सेवक वसंत देशमुख, सुभाष कासनगोटुवार, सखीना अंसारी, विना खनके, अनुराधा हजारे, सविता कांबळे, मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.