नागरिकांनी घराबाहेर पडूच नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 05:00 AM2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:56+5:30

३१ मार्चपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहे. पालकमंत्र्यांनी हे आदेश पाळताना ज्यांचे रोजच्या हातावरचे पोट आहे. त्या मजूर, कामगार, खानकामगार, रोजंदारी कामगार यांना या काळामध्ये कोणताही त्रास जाणार नाही. जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमित उघडी राहणार आहे. अन्य सर्व प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचे निर्देश आहेत.

Citizens should not leave the house | नागरिकांनी घराबाहेर पडूच नये

नागरिकांनी घराबाहेर पडूच नये

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : समाजाच्या भल्यासाठी आवश्यकतेनुसार सक्त कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र भविष्यातील परिस्थिती अतिशय कठीण असून या परिस्थितीमध्ये व्यापक जनहित बघता आवश्यकतेनुसार प्रशासनाने सक्तीने कारवाई करणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती आहे की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडूच नये. पुढील आदेशापर्यंत घरातच थांबावे, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार ना. बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणांच्या विभागप्रमुखांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर, महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहे. पालकमंत्र्यांनी हे आदेश पाळताना ज्यांचे रोजच्या हातावरचे पोट आहे. त्या मजूर, कामगार, खानकामगार, रोजंदारी कामगार यांना या काळामध्ये कोणताही त्रास जाणार नाही. जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नियमित उघडी राहणार आहे. अन्य सर्व प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित यंत्रणेने आवश्यक धान्यपुरवठा करण्याबाबतचे निर्देश केले. कुटुंबसंख्या बघून त्यांना १० ते १५ किलो धान्य या कुटुंबांना वितरित केले जावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधीत विभागाच्या मंत्र्यांना सूचना करणार असल्याचे सांगितले.

होम क्वारेन्टाईन म्हणजे बाधा नव्हे
होम क्वारेन्टाईन असणाºया जिल्ह्यातील मुंबई, पुण्याच्या विद्यार्थ्यांनी कोरणा विषाणूची त्यांना लागण झाली असे समजू नये. प्रशासन मुद्दाम त्रास देत नसून आपली व समाजाची काळजी घेत आहे. मात्र बाधा होणार नाही, यासाठी घराबाहेर पडू नये. पुढील काही दिवस आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्याच्या चुकीमुळे अवघ्या समाजाला त्याची किंमत चुकवावी लागते. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने जारी केलेल्या आवश्यक दूरध्वनी क्रमांकाचा वापर करून थोडे जरी लक्षण आढळल्यास तपासणी करावी. आपल्या कुटुंब व समाजातील अन्य लोकांच्या संपर्कात येऊ नये, मात्र शासनाचे आदेश न पाळणाºया अशा व्यक्तींवर पोलिसांना मग सक्तीने कारवाई करावी लागेल. ज्यांना अशा पद्धतीचे लक्षण आढळून येतील, त्यांना वन अकादमीमध्ये गरज पडल्यास विलगीकरण कक्षात पाठवण्यात येईल. याठिकाणी आणि वैद्यकीय सेवा सोबतच खानपणाची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

कार्यालयांचे होणार निर्जंतुकीकरण
जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आस्थापना, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणांचे एकाच वेळी निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही ना. विजय वडेट्टीवार यांनी आज केली. यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

खासगी वाहनांनाही बंदी
सध्या केंद्र सरकारने रेल्वे तर राज्य सरकारने एसटी बसेस बंद केलेल्या आहेत. मात्र तरीही नागरिक मोठया संख्येने रस्त्यावर दिसून येत आहे. पूर्णत: नागरिकांनी घरातच राहून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्यापासून खासगी वाहनांनादेखील वाहतुकीसाठी ३१ तारखेपर्यंत बंदी करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात येत आहे. पोलीस या संदर्भात कडक कारवाई करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

संशयित कोरोना रूग्णाला केले रेफर
वरोरा : कोरोना विषाणू मला झाला आहे, त्यामुळे माझ्यावर उपचार करा म्हणून स्वत: उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे दाखल झाला. रूग्णांची मानसिकता बघून उपजिल्हा रूग्णालय प्रशासनाने त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. वरोरा शहरातील एक युवक मुंबईमध्ये चार पाच दिवस राहून नुकताच परतला. मुंबई येथे फिरत असताना काही विदेशी नागरिकांच्या संपर्कात मी आलो, असे ही तो सांगत होता. त्यातच त्याने उपजिल्हा रूग्णालय गाठून माझी प्रकृती तपासा म्हणून हट्ट धरला. त्या रूग्णामध्ये तसे काही लक्षणे आढळून आले नसल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. परंतु रूग्णांची मानसिकता बघून त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.


जिल्हाभरात बंद कायम
जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारीदेखील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने बंद होती. रविवारी जनता कर्फ्यू झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील सर्व शहरात भाजी बाजार, किराणा, दूध विक्री, मेडिकल ही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडलीत. त्या वस्तू खरेदीकरिता लोक बाहेर पडलेत. पोलिसांची गाडी शहरात फिरत असून गर्दी करू नका, पाचहून अधिक लोक एकत्र जमू नका, अशा सूचना गाडीवरील ध्वनीक्षेपकाद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत. चंद्रपूर व बल्लारपूर बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकावर रविवारप्रमाणे आजही शुकशुकाट आहे. किरकोळ अपवाद वगळता लोकांनी आजही घरीच राहणे पसंत केले आहे. देशात व राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे याची माहिती घरात बसून टीव्हीच्या बातम्यांमधून घेतली जात होती.

Web Title: Citizens should not leave the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.