कुकूऽऽच कूऽ’ हा अलार्मच बिघडला; वेळीअवेळी कोंबडा आरवल्याने नागरिकांची झोपमोड
By साईनाथ कुचनकार | Published: November 6, 2022 05:38 PM2022-11-06T17:38:01+5:302022-11-06T17:41:03+5:30
कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.
चंद्रपूर - पूर्वी कोंबड्याने बांग दिली की पहाट झाली, असे समजून गाव जागे होत होते आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागत होते. ग्रामीण भागात याच अलार्मवर नागरिकांचा शंभर टक्के विश्वास होता. आता ग्रामीण भागातील हा अलार्म बिघडल्याचे चित्र आहे. वेळीअवेळी कोंबडे आरवत असल्याने थकून- भागून झोपी गेलेल्या नागरिकांची झोपमोड होत आहे. नैसर्गिक चक्र बदलल्याचा हा परिणाम आहे की आणखी कोणता हा प्रश्न सध्या ग्रामीण नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, झोपमोड होत असल्याने नेमकी तक्रार तरी कुठे करायची, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
सूर्योदयापूर्वी कोंबडे बांग देतात. हा त्यांचा नैसर्गिक नियम आहे. याच नियमावरून नागरिकांचाही दिवस सुरू होतो. मात्र, कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे, एक कोंबडा आरवला की, गावातील इतरही कोंबडे आरवणे सुरू करतात. यामुळे रात्री दोन ते तीन वाजेपासून गावात गलबला होत आहे. हे नेमके कशामुळे होते हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, नागरिकांची झोपमोड होत असल्याने पूर्वीचा हा अलार्म आता त्रासदायक बनू पाहत आहे. अशीच झोपमोड झालेल्या कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील एका नागरिकाने चक्क पहाटे तीन वाजता उठून कोंबड्यांच्या गलबल्याचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नैसर्गिक चक्र बदलले काय?
मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक चक्र बदलले आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्येक जीवावर होत आहे. त्यामुळे या कोंबड्यांनी आपला वेळ तर बदलविला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.