मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:37+5:302021-04-05T04:24:37+5:30

विसापूर : मागील काही दिवसांपासून विसापूर भूमिगत रेल्वे मार्गाजवळ मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना, लहान मुलांना रस्ता ...

Citizens suffer due to stray dogs | मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

googlenewsNext

विसापूर : मागील काही दिवसांपासून विसापूर भूमिगत रेल्वे मार्गाजवळ मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना, लहान मुलांना रस्ता पार करताना अडचण जात आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चनाखा-सातरीतील रस्ता मोकळा करा

राजुरा : तालुक्यातील चनाखा-सातरी शिवधुऱ्यावरुन वहिवाट आहे. देविदास मून, रमेश लोखंडे, राघोबा मून, नानाजी मोरे, नत्थू बोबडे यांचा मार्ग बंद करून त्यांना त्रास दिला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देविदास मून यांनी केली आहे.

कोरपना ते हातलोनी मार्गाच्या कामाला वेग

कोरपना : तालुक्यातील कोरपना ते हातलोणी दरम्यानच्या अर्धवट असलेल्या रस्त्याच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे वाहतूकदारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या मार्गामुळे हातलोणी, कुकूडबोडी, भरकिगुडा, घाटराई, सिंगार पठार, खैरगाव आदी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता होणार आहे.

दहा वर्षांपासून कोडशी बु. चे पुनर्वसन रखडले

कोरपना : पूरबाधित कोडशी बु. गावाच्या पुनर्वसनासाठी दहा वर्षांपूर्वी वणी मार्गावर जमीन आरक्षित करण्यात आली. मात्र यातील प्लॉट अद्यापही वाटप करण्यात न आल्याने तसेच सोयी सुविधा पुरविण्यात न आल्याने पुनर्वसन रखडले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

ब्रह्मपुरीत कृषी महाविद्यालयाची गरज

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असलेल्या ब्रह्मपुरी शहरात दूरवरून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. येथे कला, वाणिज्य, विज्ञान पदवी पदव्युत्तर महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, फार्मसी कॉलेज आदी शैक्षणिक संस्था आहे. मात्र कृषी महाविद्यालय नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना नागपूर किंवा वरोरा येथे शिक्षणासाठी जावे लागते. त्यामुळे येथे कृषी महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.

मूल - गडचिरोली रेल्वे मार्ग करा

मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासोबत रेल्वे मार्गाने जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल. त्यामुळे मूल ते गडचिरोली रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे.

संभाजी ब्रिगेडने केली निदर्शने

चंद्रपूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रा. दिलीप चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, विनोद थेरे, अ‍ॅड. मनीष काळे, शंकर बोढे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

शौचालयाचा वापर हाेतोय कमीच

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात आहे.

प्राचीन गुफेकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

जिवती : कोरपना व जिवती तालुक्यात कारवाई व शंकर लोधी येथे ऐतिहासिक गुफा आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही त्याची पुरातत्त्व विभागाच्या शासन दप्तरी नोंद नाही. या परिसराचा इतिहास समोर येण्यासाठी या गुफाचे संशोधन करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये त्याची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्युत खांब बदलण्याची मागणी

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता असून सदर खांब बदलण्याची मागणी आहे.

.

बेरोजगारांना निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.

अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

पांदण रस्त्यामुळे भांडणे वाढली

भद्रावती : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत.

माणिकगड पहाड ठरतोय ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी

जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणीचा डोंगर सह याही पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या येथील विकासाला चालना मिळेल. तसेच ट्रेकर्सनासुद्धा अन्य ठिकाणी जाऊन ट्रेकिंग करण्याची गरज पडणार नाही.

भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती नगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होईल. त्या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे अशी अपेक्षा इतिहासप्रेमीकडून व्यक्त होत आहे.

मुडझा-गांगलवाडी रस्त्याची दुरवस्था

ब्रम्हपुरी : तालुक्यातील मुडझा-गांगलवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.ब्रह्मपुरीपासून गांगलवाडी व मुडझा हे दोन्ही ठिकाणे २० ते ४० कि मी अंतरावर आहेत. मुडझा व गांगलवाडी ही दोन्ही ठिकाणे लोकसंख्येने मोठी आहेत. कर्मचारी, व्यापारी, शाळकरी विद्यार्थी, महिला या रस्त्याचा वापर करतात. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून गांगलवाडी-मुडझा रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे.

Web Title: Citizens suffer due to stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.