विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:24 PM2017-09-24T23:24:54+5:302017-09-24T23:25:03+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकीकडे विजेचा लपंडाव सुरू असतानाही दुसरीकडे मात्र कंबरडे मोडणाºया वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हळदा, मुडझा, पद्मापूर-भूज, बल्लारपूर ही गावे गांगलवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात समाविष्ट आहेत. येथून या गावांना विद्युत पुरवठा होत असतो. मात्र येथील कर्मचाºयांच्या लेटलतिफीमुळे व दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, या परिसरातील लोकांना अजूनही आपल्या परिसरातील विद्युत सहायक कोण, याची साधी माहितीही नाही. एखादा ग्राहक गांगलवाडी येथे आपली समस्या घेवून गेल्यास कुठलेतरी कारण समोर ठेवून समस्यांचे निराकरण करण्यास टाळाटाळ केली जाते. प्रत्येक विद्युत सहायकाला वेगवेगळी गावे दिलेली आहेत. मात्र हे विद्युत सहायक फक्त वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करायचा असेल तरच येतात. अशा चर्चा गावकºयात आहेत. या विद्युत सहायकांना अधिकाºयांचा कुठलाच धाक नसल्याने परिसरातील विद्युत सेवेचे तीन तेरा वाजले आहे.
त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास कमी दाबाची वीज राहत असल्याने घरातील पंखेसुद्धा बंद असल्याची ओरड सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतानाच वीज बिले अवाढव्य वाढून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचा सुर आहे. या समस्येचा फटका मात्र वीज ग्राहकांना बसत असताना याकडे विद्युत वितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड आहे.