'नागभीड जिल्हा' मागणीसाठी नागरिक उतरले रस्त्यावर, शहर कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:37 AM2023-07-11T11:37:02+5:302023-07-11T11:37:53+5:30
तहसीलदारांना दिले निवेदन
नागभीड (चंद्रपूर) : नागभीड जिल्ह्याच्या मागणीसाठी सोमवारी नागभीडकर मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आणि नागभीड जिल्हा झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली. जिल्ह्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चास तालुकावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागभीड जिल्हा कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नागभीड जिल्हा मागणीसाठीच्या या मोर्चाची सुरुवात येथील टीचर्स सोसायटीच्या कार्यालयापासून झाली. खिशाला जिल्हा मागणीचा बिल्ला आणि हातात फलक घेऊन तसेच जिल्हा मागणीच्या विविध घोषणा देत हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध रितीने शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला. हा मोर्चा येथील तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेस अनेकांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास मागणी करणाऱ्या इतर तालुक्यांपेक्षा नागभीड हा तालुका सर्वच दृष्टीने योग्य आहे. केवळ क्रांतिभूमी किंवा व्यापारनगरीचे निकष लावून जिल्ह्याची निर्मिती न करता इतर तालुक्यांना सर्वसमावेशक व सर्वांना मध्यवर्ती ठरणाऱ्या नागभीड येथेच जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी या सभेत केली. या मोर्चासोबतच जिल्हा मागणीच्या समर्थनार्थ नागभीडकरांनी संपूर्ण नागभीड शहर कडकडीत बंद ठेवून नागभीड जिल्हा मागणीला पाठिंबा दर्शविला. वैद्यकीय प्रतिष्ठाने वगळता शहरातील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध
चिमूर येथे शासनाने अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीची घोषणा केली आहे. चिमूर हे ठिकाण एका टोकाला असून, गैरसोयीचे आहे. त्यामुळे नागभीडचा चिमूर अपर जिल्हाधिकारी यात समावेश करू नये, अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
त्या प्रश्नाचा निषेध
नुकतीच पोलिस पाटील पदाची परीक्षा झाली. या प्रश्नपत्रिकेत कोणत्या तालुक्याची जिल्ह्याची मागणी सुरू आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्यायात ज्या तालुक्याने जिल्ह्याची कधीच मागणी केली नाही त्याही तालुक्याचे पर्यायात नाव देण्यात आले होते. मात्र, नागभीडकर सातत्याने मागणी करीत असूनही नागभीडचे नाव वगळण्यात आले. प्रशासनाने केलेल्या या घोडचुकीची या सभेत तीव्र शब्दात निंदा करण्यात आली.
बैलबंडी आणि दिंडीने वेधले लक्ष
या मोर्चात काही शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. तर एक भजन दिंडीही सहभागी झाली होती. सहभागी झालेल्या या बैलबंडी आणि दिंडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.