पेयजलासाठी नागरिकांची चिखलातून फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:33 AM2021-09-17T04:33:07+5:302021-09-17T04:33:07+5:30
गोंडपिपरी : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरिकांच्या पेयजल सुविधेसाठी अस्तित्वात असलेल्या कूपनलिकेच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
गोंडपिपरी : शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरिकांच्या पेयजल सुविधेसाठी अस्तित्वात असलेल्या कूपनलिकेच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रभागवासीयांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे. पेयजल मिळवण्यासाठी नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत असून, स्थानिक नगर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे आनंद गोहणे यांनी केला आहे.
शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यातच सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून शहर व तालुका परिसरात साथरोग पसरले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवत असताना येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये पेयजलासाठी अस्तित्वात आणलेल्या कूपनलिकेच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य व चिखल तयार झाल्याने येथील नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. कूपनलिकेपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना चक्क चिखलातून वाट काढावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी शिवसेनेचे आनंद गोहणे यांनी केली आहे.