किमान वेतनासाठी सीटू, आयटक कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:39 PM2018-01-17T22:39:35+5:302018-01-17T22:40:03+5:30
शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे. काहींना मानधन तर काहींना कामाचा मोबदला दिल्या जातो. मात्र किमान वेतन कोणालाही दिल्या जात नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, या मागणीसाठी बुधवारी सीटू, आयटक सलंग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून केंद्र शासनाला निवेदन पाठविले.
केंद्र शासनाने कामगार विषयक धोरण ठरविण्याच्या उद्देशाने ४५ वे श्रमसंमेलन आयोजित केले होते. या संमेलनात तीन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. योजना कर्मचारी स्वयंसेवक नाही तर ते कामगार आहेत. त्यांना देखील किमान वेतन दिले पाहिजे. तसेच सामाजिक सुरक्षा प्राव्हडंट फंड व पेंशन लागू करण्यात यावी, असे तीन ठराव तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.
मात्र चार वर्ष लोटूनही त्या ठरावाची अंमलबजावणी मोदी सरकारने केली नाही. त्या ठरावाची अंमलबजावणी करून किमान वेतनाच्या मागणीसाठी देशातील विविध संघटनांच्या वतीने १७ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला. या निमित्ताने चंद्रपुरातही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य योजना कर्मचारी सहभागी झाले होते.
योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून घोषित करा, योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा द्या, किमान वेतन १८ हजार रुपये मिळालेच पाहिजे, प्राव्हडंट फंड तथा पेंशन लागू करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला व मागण्यांचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व आयटकचे विनोद झोडगे, दिलीप बर्वी, सीटूचे प्रा. रमेशचंद्र दहीवडे, संतोष दास, भाकपाचे प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, शोभा बोगावार यांनी केले. मोर्चात वंदना मुळे, प्रणिता लांडगे, वंदना जिवणे, संध्या खनके, पवित्रा ताकसांडे, ललीता चौधरी, वैशाली बोकारे, प्रमोद गोरघाटे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.