शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 12:34 AM2017-05-09T00:34:15+5:302017-05-09T00:34:15+5:30

केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

The city is clean, make the mind clean! | शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

शहर स्वच्छ झाले, मनेही स्वच्छ व्हावी !

Next

राजेश भोजेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारने देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेबाबत घेतलेल्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशातील ७२६ शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा ७६ वा क्रमांक लागला. आणि राज्यात सहावा. गौरवाची बाब म्हणजे, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अकोला या महानगरांना मागे टाकत चंद्रपूरने ही बाजी मारताना विदर्भात स्वच्छतेच्या बाबतीत मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. ही बाब चंद्रपूरकांना अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. चंद्रपूरला महानगराचे स्वरुप येऊन जेमतेम पाच-सहा वर्षे झालीत. या काळात चंद्रपूरने राज्यात टॉप टेन शहरामध्ये मिळविलेला हा सन्मान चंद्रपूर बदलत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. पुण्या-मुंबईत बसून चंद्रपूरकडे बघितल्यानंतर हे शहर अतिशय दुर्गम असल्याचे जाणवते. तसे ऐकायलाही मिळते. अधिकारी वर्गही पूर्वी या शहरात बदली घेताना विचारच करायचा. मात्र त्यांच्या लेखी दुर्गम असलेल्या या शहराने राज्यात सहावा क्रमांक पटकावून त्या सर्वमंडळींचे एकाएकी डोळे उघडले आहे. ही बाब पूर्वीपासून मिरवत आलेल्या महानगरांचे गर्वहरण करणारी आहे. या यशाचे श्रेय महापालिकेला असले तरी यामध्ये चंद्रपूरकरांचा वाटाही तेवढाच मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. पालिकेने कितीही स्वच्छता मोहिमा राबविल्या आणि त्यासाठी जनतेचे सहकार्यच नसेल, तर परिणामकारकता शून्य ठरते. एकाएकी लागलेल्या आश्चर्यकारक निकालामुळे चंद्रपूरकरांसह पालिकेची जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. यापुढे हा क्रमांक कायम ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. स्वप्न मोठेच बघितले पाहिजे. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मार्गातील अनेक अडथळे केव्हा दूर झाले हे कळतदेखील नाही. प्रयत्नच झाले नाही तर मिळाले ते स्थानही गमाविण्याची भीती असते. आणि हे अपयश खाली बघायला लावणारे ठरते. म्हणूनच चंद्रपूरकर व पालिका हे यश कसे पचविते, हे महत्त्वाचे ठरेल.
पालिकेकडे अनेक योजना आहेत. या मध्यमातून ती शहराचा कायापालट करण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार. या योजना जनहितार्थच असल्या तरी स्वच्छतेसारख्या काही योजनांमध्ये जनतेचाही प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो. यासाठी जनजागृती केली जाते. वास्तविक, या जनजागृतीवर लागणाऱ्या खर्चात अनेक विकासकामेही करता येणे शक्य आहे. मात्र सामान्य मानसिकता आहे, आपला कचरा दुसरीकडे फेकून आपले घर वा परिसर स्वच्छ ठेवण्याची. मग जनजागृतीपर केलेला खर्च वाया जाणारच. ही जनजागृती एकाच विषयावर वर्षानुवर्षांपासून केली जात आहे. यावर झालेला खर्च जनतेच्या खिशातून कराच्या स्वरुपात शासनाकडे जमा पैशात असतो. काहीच लोकांवर या जनजागृतीचा परिणाम होतो. अनेकांना कळते पण वळत नाही. काहीजण याकडे लक्षही द्यायला तयार नसतात. मात्र आपणच कचरा फेकल्यानंतर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असे बोलणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या विविधांगी मानसिकतेने नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असते. आपण आपले घर स्वच्छ राहावे म्हणून जसा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न प्रत्येकांनी आपला परिसर व शहर स्वच्छ राहण्यासाठी केला, तर एकेदिवशी चंद्रपूर प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर झाल्यावाचून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती प्रत्येक चंद्रपूरकरांनी स्वच्छतेचा ध्यास घेण्याची.

Web Title: The city is clean, make the mind clean!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.