चंद्रपुरातील खड्ड्यांविरोध शहर जिल्हा काँग्रेसने केले भजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:40+5:302021-08-25T04:33:40+5:30
चंद्रपूर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष ...
चंद्रपूर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता तरी शहरातील सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी बागला चौकात भजन आंदोलन करून लक्ष वेधले.
बाबूपेठ, महाकाली कॉलरी, लालपेठ, जुनोना चौक, भिवापूर या परिसरातील नागरिक कामासाठी शहरात ये-जा करताना बागला चौक ते कस्तुरबा चौक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालविणाऱ्या या परिसरातील नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. जनतेने विश्वास टाकत सत्ता दिली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला, असा गंभीर आरोपही यावेळी रामू तिवारी यांनी केला. यावेळी भजन मंडळी आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भजन सादर करीत निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सेवादल अध्यक्ष नंदू खनके, श्रीनिवास गोमासे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष अनुताई दहेगावकर, यांच्यासह चंदाताई वैरागडे, दुर्गेश कोडाम, पिंकी दीक्षित, उषाताई धांडे, राजेश अडूर, गोपाल अमृतकर, राजेश रेवल्लीवार, बापू अन्सारी, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, अशोक गद्दामवार, एकता गुरले, युसूफ चाचा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.