दारू पकडण्यासाठी सिटी पोलिसांची ‘सर्च’ मोहीम
By admin | Published: February 14, 2017 12:38 AM2017-02-14T00:38:42+5:302017-02-14T00:38:42+5:30
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधावर शहर पोलिसांनी जमनजट्टी दर्गा मागील मोकळ्या जागेवर दारूसाठा शोधण्यासाठी तीन तास सर्च मोहीम राबवली.
तीन तास शोध : सहा लाख ४० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त
चंद्रपूर : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधावर शहर पोलिसांनी जमनजट्टी दर्गा मागील मोकळ्या जागेवर दारूसाठा शोधण्यासाठी तीन तास सर्च मोहीम राबवली. पोलिसांनी तब्बल एक किलोमीटरचा परिसर पिंजून काढून सहा लाख ४० हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातंर्गत पठाणपुरा गेटबाहेरील जमनगट्टी दर्गामागील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात दारूसाठा लपवून असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार सुनील ताजणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोधपथकाचे प्रमुख राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील पथक घटनास्थळी दाखल झाले. दारु शोधण्यासाठी सदर परिसरात तीन तास सर्च मोहीम राबविण्यात आली. यावेळी एका ठिकाणी देशी दारूच्या ३६ पेट्या पोलिसांना लपवून असलेल्या आढळल्या. पोलिसांना दारूसाठा जप्त केला असून जप्त केलेल्या दारूची किंमत सहा लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस जाण्यापूर्वीच दारुविक्रेते घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे पोलिसांना दारूसाठा घेऊनच परतावे लागले.
तसेच चंद्रपूर शहर पोलिसांनीच केलेल्या दुसऱ्या कारवाईत एक लाख १० हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई लालपेठ परिसरातील वाघोबा मंदिराजवळ करण्यात आली. दुचाकीसह आरोपीला अटक करून लाख रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप दीवाण, अपर अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक विवेक देशमुख, प्रभूदास माऊलीकर, सुरेश केमेकर, किशोर तुमराम, अफसर पठाण, दिलीप चौधरी, संजय आतकुलवार, अमोल गिरडकर, किशोर वैरागडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध दारूवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धरपकड मोहीम राबविली असून, दारूविक्रेत्यांना जेरबंद केले जात आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (नगर प्रतिनिधी)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
जिल्ह्यात सद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा माहोल सुरू आहे. या माहोलमध्ये रंग भरण्यासाठी उमेदवाराकडून दारूचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारूची तस्करी होत आहे.