शहर माझे असल्याचा सर्वप्रथम विचार करावा

By admin | Published: June 24, 2017 12:36 AM2017-06-24T00:36:45+5:302017-06-24T00:36:45+5:30

केंद्र आणि राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे केंद्राच्या अनेक कल्याणकारी योजना आपणही चंद्रपुरात आणू शकतो.

The city should be considered first of all | शहर माझे असल्याचा सर्वप्रथम विचार करावा

शहर माझे असल्याचा सर्वप्रथम विचार करावा

Next

सुधीर मुनगंटीवार : मनपाच्या सात कल्याणकारी योजनांचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र आणि राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे केंद्राच्या अनेक कल्याणकारी योजना आपणही चंद्रपुरात आणू शकतो. आज शुभारंभ करण्यात आलेल्या सात योजनांमधून कल्पकता प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शहर माझे आहे, असा विचार नागरिकांनी प्रथम करावा, असे आवाहन प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पालकमंत्री जनकल्याणकारी योजनांच्या शुभारंभप्रसंगी ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा आयुक्त संजय काकडे, जि.प.चे उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, माजी महापौर राखी कंचलार्वार, मनपा गटनेता वसंता देशमुख, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले की, महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी स्वीकारत असते. मनपामुळे शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. मात्र त्यासाठी कल्पकता महत्त्वाची आहे. कोणतीही पैशांनी नव्हे तर नवनवीन कल्पकतेने मोठी होत असते. या पालिकेतर्फे सुरू होणाऱ्या नवीन योजनांचा लाभ शेवटच्या माणसाला मिळाला पाहिजे.
शिक्षण व स्वच्छता या विषयावर चंद्रपूर महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत केले. ही आनंदाची बाब आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विदर्भात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेने राज्यात व देशातही आपले स्थान निर्माण करावे. लोककल्याणकारी योजनांमध्ये लोक सहभाग वाढविला तर आणखी पुढे जाता येईल, असे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी महागनरपालिकेच्या स्थायी समिती सभापती म्हणून निवड झालेल्या राहुल पावडे यांच्या पदग्रहणप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ किती आहे, याची चिंता करण्यापेक्षा आपल्या कार्यकाळात किती चांगले काम आपण करु शकतो, याचा विचार करावा. स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांच्या हातात सभापतिपदाची जबाबदारी आल्याने शहराच्या विकासात नक्कीच त्याचा फायदा होईल. महापालिकेने गरिबांच्या सेवेला प्राधान्य दयावे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी पालकमंत्री पेयजल योजना, शालेय शिष्यवृत्ती योजना, सब पढे सब बढे मिशन, धनलक्ष्मी योजना, स्वस्थ आरोग्य मिशन, जल व जनसंरक्षण अभियान, शासकीय योजना माहिती केंद्र या योजनांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमात पालकमंत्री पेयजल योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या शहीद भगसिंग शाळेला वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी केले. कार्यक्रमला मोठया संख्येने नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

बल्लारपूरमध्ये पहिले मॉडेल स्कूल
बल्लारशा येथे राज्यातील पहिली महिला मॉडेल स्कूल तयार होत आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पेपरलेस शिक्षण, संगणक आदी अत्याधुनिक ज्ञान घेता येईल. माहितीचे स्त्रोत संगणकावरुन लवकर मिळत असले तरी त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे शाळेतच शिकावे लागते. त्यामुळे महानगरपालिकेने आपल्या शाळा उत्तम कराव्या व शैक्षणिक वातावरण चांगले ठेवावे. केंद्र आणि राज्यातर्फे महानगरपालिकेला देण्यात येणा-या विविध पुरस्कार योजनेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेनेसुध्दा सहभाग नोंदवावा. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे

Web Title: The city should be considered first of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.