व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ!

By Admin | Published: January 3, 2015 12:58 AM2015-01-03T00:58:25+5:302015-01-03T00:58:25+5:30

१५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The city sits on the sidewalk! | व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ!

व्यापाऱ्यांनी गिळले शहरातील फुटपाथ!

googlenewsNext

गणेश खवसे / संतोष कुंडकर चंद्रपूर
शहराच्या कोणत्याही भागात मुख्य रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एरवी पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर चहाची टपरी चालविणाऱ्याला महापालिकेचा अतिक्रमण विभाग सुखाने जगू देत नाही. दुसरीकडे मात्र हजारो रुपयांचा माल रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवून उघडपणे विकला जात असताना चंद्रपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण विभाग डोळे मिटून दूध पिण्याचे काम करीत आहे. आयुक्तांनी यात लक्ष घालून हे प्रकार थांबविण्याची गरज आहे.
शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त व्हावेत, नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे मिळावेत, यासाठी गेल्या दोन वर्षांत एक ते दोन वेळा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दोन्ही मोहिमेला काही प्रमाणात यश आले. मात्र, झोनस्तरावरील यंत्रणा व अतिक्रमण पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वार्थासाठी या मोहिमेलाच हरताळ फासला आहे. सध्या शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्रमणांचा बोलबाला आहे. शहरातील गांधी चौकापासून ते जटपुरा गेटपर्यंत दुतर्फा विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळते. शहरातील ज्या भागातील वर्दळ विरळ आहे, त्या ठिकाणी फुटपाथवर काही व्यापाऱ्यांनी दुकानेच उघडली आहेत.
सोफासेट, आलमारी, टेबल, बांबूपासून तयार केलेले फर्निचर, चिनीमातीपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, काचेचे झुंबर, विविध गृहोपयोगी वस्तू, जोडे, चपला, खेळणी, दरी, सतरंजी, गालिचापर्यंत सर्वकाही रस्त्याच्या कडेला विकले जात आहे. शोरूमपेक्षा काहीशी स्वस्त दरात या वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहकही येथून खरेदी करीत आहेत. यासोबतच पानटपरी, कपड्यांच्या दुकानादांनी दुकानच फुटपाथवर थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होते.
अतिक्रमण नेमके कुठे?
चंद्रपूर शहरात दोनच मुख्य मार्ग आहेत. या दोनही मुख्य मार्गावर दोनही बाजूने महापालिकेने फुटपाथ तयार केले आहेत. गांधी चौक ते जटपुरा गेट, जटपुरा गेट ते बंगाली कॅम्प, जिल्हा वाहतूक शाखा ते दुर्गापूर, गिरनार चौक ते रेल्वे गेट, जटपुरा गेट ते रामनगर तेथून पुढे इरई नदीपर्यंत, गांधी चौक ते पठाणपुरा मार्गावर फुटपाथ आहेत. यातील बहुतांश फुटपाथ लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी गिळंकृत केले आहेत.
झोन अधिकाऱ्यांचे अभय
झोनस्तरावर कारवाई करण्याचे अधिकार झोन अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, दररोज हजारो रुपयांचा माल फुटपाथवर विकणाऱ्या या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी झोन अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाहीत. झोन अधिकाऱ्यांनीच खऱ्या अर्थाने विक्रेत्यांना अभय दिले आहे. एरवी गरीब विक्रेत्यांवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या या अधिकाऱ्यांना आता आयुक्तांनी जाब विचारण्याची गरज आहे. मात्र आजवर असा जाब विचारण्यात आला काय, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
समस्या मांडायची तरी कुणाकडे?
शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. या अतिक्रमणाला वेळीच आळा घातला नाही तर अख्ख्या चंद्रपुरातील फुटपाथ काही दिवसांनी दुकानांनी सजलेले दिसेल. वाढत्या अतिक्रमणाबाबत विचारणा करण्यासाठी महानगर पालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ होता. फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी ही अतिक्रमण विभागाची असल्याने एका जबाबदार अधिकाऱ्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता उचलला नाही. त्यानंतर बऱ्याचदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मोबाईल स्विच आॅफ करून ठेवला. त्यामुळे ही समस्या मांडायची तरी कुणाकडे, असा प्रश्न पडतो.
उद्घाटनालाच लावला टिळा
रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेच्यावतीने एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत आठवड्यातील शुक्रवारी - शनिवारी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ट्रॉलीसह ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. या मोहिमेत वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी, नागरी पोलीस व अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. ३१ आॅक्टोबरला केवळ एक दिवस शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मोहिमेतील ट्रॅक्टर नादुरूस्त झाले. ते दोन महिन्यानंतरही दुरूस्त झाले नाही. गेल्या दोन महिन्यात एकही दिवस ही मोहीम राबविण्यात आली आहे.

Web Title: The city sits on the sidewalk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.