चिमुरात श्रीहरी बालाजी महाराजांच्या विष्णुरूपी प्रतिकृतीचे नगरभ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:56+5:302021-02-27T04:36:56+5:30
: कोरोनामुळे ३९४ वर्षांची घोडा रथयात्रा खंडित चिमूर : चिमुरातील घोडा रथयात्रा १६ ते २८ फेब्रुवारीपर्यत चालणार होती. मात्र ...
: कोरोनामुळे ३९४ वर्षांची घोडा रथयात्रा खंडित
चिमूर : चिमुरातील घोडा रथयात्रा १६ ते २८ फेब्रुवारीपर्यत चालणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घोडा रथयात्रेची परवानगी नाकारल्यामुळे परंपरेनुसार दरवर्षी होणारी घोडा रथयात्रा यावर्षी श्री हरी बालाजी देवस्थान ट्रस्टने रद्द केली. मात्र देवस्थान कमिटीने परंपरेनुसार चिमूर नगरीचे आराध्य श्रीहरी बालाजी महाराज यांची प्रतिकृती विष्णुरूपात लाकडी रथावर अश्वारूढ करून गुरुवारी रात्री दीड वाजता शहरातील मुख्य मार्गाने नगरभ्रमण करून पहाटे ५ वाजता मंदिरासमोर विराजमान झाली.
कोरोनामुळे शेकडो बालाजी भक्तांनी घरूनच दर्शन घेतले. परंपरेनुसार १६ फेब्रुवारी, मिती माघ शुद्ध पंचमीला घोडा रथयात्रेचे नवरात्र प्रारंभ झाले. सुरवातीला मिती माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी, मिती माघ नवमीला गरुड वहन, मिती माघ शुद्ध एकादशीला मारोती वहन निघाल्यानंतर मिती माघ शुद्ध त्रयोदशी २५ फेब्रुवारीला रात्री दीड वाजता श्रीहरी बालाजी महाराज यांची प्रतिकृती असलेली लाकडी विष्णूची मूर्ती घोड्यावर आरूढ करून शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. त्याला रातघोडा असे संबोधतात. या यात्रेची सांगता महाशिवरात्रीला होते. गुरुवारी काहींनी घरातूनच तर काहींनी मुख्य रस्त्यावर येऊन श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.