शहरातील कामे दर्जेदारच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:00 AM2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:37+5:30
निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले. रस्ते बांधकाम करताना त्या परिसरात अमृत पाइपलाईनचे जोडणीचे कार्य पूर्ण झाले नसेल तर बांधकाम कार्य सुरू करू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेत कुठेही तडजोड मान्य केल्या जाणार नाही. सर्व कामे दर्जेदारच होणार, अशी ग्वाही महापौर राखी कंचलार्वार यांनी दिली. शुक्रवारी मनपाच्या स्थायी सभागृहात झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, नगरसेवक संदीप आवारी, रवी आसवानी, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, प्रभारी नगररचनाकार आशीष मोरे, रविंद्र हजारे, राजीव पिंपळशेंडे, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले. रस्ते बांधकाम करताना त्या परिसरात अमृत पाइपलाईनचे जोडणीचे कार्य पूर्ण झाले नसेल तर बांधकाम कार्य सुरू करू नये. अमृत नळजोडणीचे काम करावयाचे झाल्यास सदर प्रस्तावित रस्ता पुन्हा फोडण्याची गरज भासता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भविष्यात कराव्या लागणाऱ्या कामांचा विचार करा. सध्या प्रस्तावित कामांच्या जागेवर जर पुढे जाऊन मोठे काम करता येईल या दृष्टीने नियोजन करावे. रस्त्याच्या बाजूने डक्ट प्रणाली (पोकळी असलेले सिमेंटचे पाईप्स ) करावी. जेणेकरून शहरात भविष्यात येणाºया विविध योजनांच्या लाईन्स यातून नेता येतील. नियोजित कामांच्या जागी किती घरी अमृत नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे, याची शहनिशा करून त्याचा अहवाल नियमित द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
अधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल
नवीन बांधकाम सुरू असताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम सुरु असल्याची खात्री करावी. जिथे मोठे अपार्टमेंट्स व इमारती आहेत त्यांच्या सांडपाण्याची जोडणी पालिकेच्या मुख्य लाईनशी करावी. विकसित भागात पालिकेची मुख्य लाईन नसेल त्या ठिकाणी सोकपीट आहे की नाही याची खात्री करावी. निर्देशित केलेल्या सर्व कामांच्या अंमलबजावणीचा अहवाल येत्या १५ दिवसात देण्याचे निर्देश महापौर राखी कंचलार्वार यांनी सदर बैठकीत दिले.