शिवसेनेच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव
By admin | Published: April 21, 2017 12:58 AM2017-04-21T00:58:51+5:302017-04-21T00:58:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
आश्वासनाची पूर्तता नाही : आंदोलनाचा दिला इशारा
वरोरा : गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्याकरिता विरोधी गट नेता गजानन मेश्राम यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात जनतेला घेऊन नगराध्यक्ष यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकरांना नगराध्यक्ष यांनी सर्व समस्या ३ ते ४ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ८ दिवस होऊनही एकही समस्या मार्गी लागली नसल्याने गुरुवारला नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. नगराध्यक्ष साहेब आश्वासन दिले, पण पूर्तता केव्हा करता? असा सवाल उपस्थित करीत नगराध्यक्षांना त्यांनी घेराव घातला.
वरोरा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी १३ एप्रिलला नगरपालिकेवर शेकडो जनतेला घेऊन मोर्चा काढला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून राजीव गांधी वॉर्डात येत्या तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन तसेच जोपर्यंत ट्यूबवेल लावली जात नाही, तोपर्यंत वॉर्डमध्ये टँकरने पाणी देण्याचे चर्चेत ठरले होते.
पण ८ दिवस लोटूनही एकही टँकर आले नसल्याचा आरोप नागरसेवकांनी केला आहे. तसेच शहरातील विविध प्रभागातील नाल्या, मोठे नाले यांची सफाई, अनेक वर्षांपासून वॉर्डात राहत असलेल्या नागरिकांना एटॅक्स लागलेला नाही, त्यांना एटॅक्स लावण्याबाबत, तसेच शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आहे, शहरातील हातपंप बंद अवस्थेत आहे, अनेक कामांचे उदघाटन झाले आहे; पण कामे सुरु झाली नाहीत, अश्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढला होता व त्यात चर्चे अंती ३ ते ४ दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी नगरसेवकांना दिले होते. मात्र आठ दिवस लोटूनही आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे २० एप्रिलला शिवसेना नागसेवकांनी नगराध्यक्ष यांना घेराव घातला.
येत्या सात दिवसात सर्व समस्या निकाली निघाल्या नाही तर शिवसेना मोठे आंदोलन करेल व गरज पडल्यास नागपालिकेला कुलूप ठोकण्यासही मागेपुढे बघणार नाही, असा इशारा देण्यात आला.
त्यानंतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांना समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पंकज नाशिककर, चंद्रकला चिमुरकर, राखी गिरडकर, सन्नि गुप्ता, दिनेश यादव, सुषमा भोयर, प्रणाली मेश्राम , गजानन मेश्राम, राशी चौधरी, राजेश महाजन आदी नगरसेवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )