नांदगाव (पोडे) येथील नागरिक वीज समस्येने त्रस्त
By Admin | Published: July 2, 2016 01:11 AM2016-07-02T01:11:45+5:302016-07-02T01:11:45+5:30
तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत आहे. परिणामी गावातील नळ योजना तीन दिवसापासून बंद आहे.
वीज पुरवठा वारंवार खंडित : नळ योजनेचा पाणी पुरवठा बंद
बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत आहे. परिणामी गावातील नळ योजना तीन दिवसापासून बंद आहे. यामुळे गावात कृत्रीम पाणी टंचाई समस्या निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या तुघलकी कारभारामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे व माजी सरपंच गोविंदा पोडे यांनी केली आहे.
नांदगाव (पोडे) गावाची लोकसंख्या पाच हजारावर आहे. यामुळे वीज ग्राहकांची संख्या मोठी आहे. येथील नागरिक कित्येक महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येनी त्रस्त झाले आहेत. याचा विपरीत परिणाम गावातील नळ योजनेवर होत आहे. नळ योजना कार्यान्वित असूनही येथील नळधारकांना कृत्रीम पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावातील वीज समस्या सोडवावी म्हणून बल्लारपूर येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले.
प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. परंतु वीज वितरण कंपनीने आजतागायत नांदगाव (पोडे) येथील वीज समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने व्यापारी वर्गही त्रस्त आहे. आता तर पावसाळा सुरु झाल्याने सलग तीन दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरु असल्याने नागरिक अडचणीत आल ेआहेत. वीज कर्मचारी थातुरमातूर दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरु करतात. मात्र सदर वीज पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे कुचकामी ठरत आहे.
यावर कायम स्वरूपात उपाययोजना करुन वीज पुरवठा नियमित सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, माजी सरपंच गोविंदा पोडे, सुनिल शेंडे, गुलाब उपरे, मनोहर देऊळकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)