पिण्याच्या पाण्यासाठी खडकीतील कोलामाचा संघर्ष
By admin | Published: March 7, 2017 12:36 AM2017-03-07T00:36:18+5:302017-03-07T00:36:18+5:30
पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी जिवती तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
जिवती : पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी जिवती तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामुळे पहाडावरील अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. यावर मात करण्यासाठी व टँकरमुक्त गावे करण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळे प्रयोग केले जातात. तरीही जीवती तालुक्यातील खडकी, रायपुर, पाटागुडा या गावासह अनेक गावात मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईची झळ पोहचली असून भर उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तालुक्यातील खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील खडकी, रायपूर या गावात शासनाने जलस्वराज्य प्रकल्पातून विहीर बांधकाम करण्यात आले आहेत. विहीर गावापासून दीड -दोन कि.मी.अंतरावर असल्याने खोल दरीतून अदिवासी कोलाम महिलांना डोक्यावर व कमरेवर भांडे घेऊन पिण्याचे पाणी आणावे लागते. यापेक्षाही भयानक स्थिती आहे. खडकीतील कोलामाची शासनाने विहिरीचे काम केले. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसातच विहिरीवरील संरक्षण भिंत तर पडलीच पण त्यातील पाण्याचा साठाही आटला. अशा स्थितीतसुध्दा येथील नागरिक आहे त्या पाण्यावर तहान भागवित आहे .
संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने गावातील पाण्याची पातळी पाहून आवश्यकतेप्रमाणे पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे.
मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या विहिरीतील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने परिणामी नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची ओरड सुरू आहे. या संबंधित बाबीकडे लक्ष देवून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुणीही देईना लक्ष
खडकी या आदिवासी कोलाम गुड्यात केवळ १२ घराची वस्ती असून संपूर्ण कोलाम बांधव दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष निघून गेली. सत्ता बदलली. लोकप्रतिनिधी बदलले. परंतु खडकी गुड्यातील पाणी, वीज, आरोग्य, रस्ते या समस्या कायम आहेत. समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. निवेदन दिली. पण कुणीही या गुड्याकडे फिरकले नाहीत.