सीईओंनी घेतला विद्यार्थ्यांचा वर्ग
By admin | Published: July 27, 2016 01:20 AM2016-07-27T01:20:25+5:302016-07-27T01:20:25+5:30
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी पंचायत समिती, भद्रावती क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा
भद्रावती तालुक्यातील अनेक गावांना भेटी : विकास कामांची केली पाहणी
भद्रावती : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांनी पंचायत समिती, भद्रावती क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा तिरवंजा (मोकासा) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गातील मुलांच्या गुणवत्तेविषयक वाचन, लेखन, घेऊन अभ्यासक्रमाबाबत विचारणा केली. तसेच शैक्षणिक व सामान्यज्ञानावर चर्चा केली.
या भेटीदरम्यान शाळा इमारत, डिजीटल कक्ष, स्वयंपाकघर व शौचालय इत्यादीची पाहणी केली व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करून शाळेमध्ये पुन्हा काय सुधारणा करता येईल, याबाबत सूचना दिल्या. शाळेच्या आवारात भाजीपाला घेऊन, त्याचा वापर शालेय पोषण आहारात करावा, अशा सूचनाही दिल्यात. शौचालयाचा महत्त्व पटवून शौचालयाचा वापर करण्याविषयी मुलांना आवाहन केले. भेटीदरम्यान मुख्याध्यापिका अल्का ठाकरे व शिक्षकवृंद उपस्थित होते.
त्यानंतर ग्रामपंचायत घोडपेठला भेट दिली. या भेटीत ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत सुरू असलेल्या शुन्य ते तीन दिवस या कार्यक्रमास भेट दिली. तसेच या कार्यक्रमाच्या सर्वसमावेशन आराखड्याला मान्यता देण्याबाबत ग्रामसभेला भेट दिली. यावेळी ग्रामसभेला संबोधित करताना, ‘आमचा गाव, आमचा विकास’ या योजनेची रुपरेषा समजावून सांगितली.
गावकऱ्यांना स्वच्छतेविषयक महत्त्व पटवून देत शौचालयाचा नियमित वापर करावा, असे आवाहन केले. गावात सर्व योजना घेऊन गाव समृद्ध करावे अशा सूचनाही ग्रामस्थांना केल्या. ग्रामसभेला शंभरहून जास्त नागरिकांची उपस्थिती होती.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र घोडपेठ येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत चर्चा केली. त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुख सोईबाबत विचारणा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व खोल्याची पाहणी केली. त्यानंतर उपलब्ध औषधांच्या साठ्याची सुद्धा पाहणी केली व अडचणी सुद्धा जाणून घेतल्या.
रुग्णांना आवश्यक त्या सुख-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत अधिकारी डॉ. अवताडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांना सूचना दिल्या. भेटीदरम्यान गटविकास अधिकरी संदीप गोडशेलवार, गटशिक्षणाधिकारी अरुण काकडे, गावचे सरपंच, ग्रापंचायत सदस्य तथा ग्रामसेवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)