कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:45 AM2017-06-22T00:45:50+5:302017-06-22T00:45:50+5:30

पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला.

Before the clay can be extracted from the ground, | कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

Next

पावसाचा दगा : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायम
प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला. त्या पावसाने कपाशीला कोंब अंकुरले. पावसाची आवश्यकता असताना ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. आज उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. परंतु, पाऊस येण्याचे कोणतेच संकेत नसल्याने कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली आहे.
शेतकऱ्यांचे मागील चार पाच वर्ष कोरड्या, ओल्या दुष्काळात गेले. यावर्षी कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा दिला. चांगला पाऊस येईल आणि यावर्षी शेतात चांगले उत्पादन होईल, अशी आस शेतकरी बाळगून होते. हवामान खात्यानेही ९८ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दिवसंरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी सुखाचे दिवस येईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने धूळपेरणी केली. मात्र तुरळक आलेल्या पावसाने कपाशीला जमिनीतच कोंब आले. त्यानंतर तीन दिवस पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र पावसानेही ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला.
शेतकऱ्यांनी जमिनीत पेरलेले कपाशीचे बियाणे पावसाअभावी जमिनीतच सडून गेले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांनी पावसासाठी गावोगावी आराधना करायला सुरुवात केली आहे. मात्र चार दिवसांपूर्वी आलेला पाऊस अचानक गायब झाल्याने पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उसनवारी करून शेतकऱ्यांनी बी-बियाणांची कशीबशी जुळवाजुळव केली. कर्ज काढून बियाणे विकत घेतले. पण पावसाने दगा दिला आहे.

दुबार पेरणीचे
संकट अटळ
आज, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत बियाण्यांची लागवड केली. तुरळक आलेल्या पावसाने कपाशीची सरकी जमिनीतच खराब झाली. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला असून पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.

हवामान खात्याचा अंदाज चुकला
१० जून पासून पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरचा विश्वासच उडत चालला आहे.

Web Title: Before the clay can be extracted from the ground,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.